You are currently viewing शिक्षणातील २५ वर्षांचा सुवर्णप्रवास :

शिक्षणातील २५ वर्षांचा सुवर्णप्रवास :

शिक्षणातील २५ वर्षांचा सुवर्णप्रवास : सिंधुदुर्ग विद्या निकेतनचा रौप्य महोत्सव

फनफेअर व स्नेहसंमेलनाने होणार साजरा

वेंगुर्ला :

सिंधुदुर्ग विद्या निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल, वेंगुर्ला यांच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण होत असून या रौप्य महोत्सवानिमित्त फनफेअर व वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. “२५ वर्षांच्या एकत्रित वाटचालीचा उत्सव” या संकल्पनेतून हा सोहळा अत्यंत अभिमान आणि आनंदाच्या वातावरणात साजरा होणार आहे.

भूतकाळाचा गौरव, भविष्याला प्रेरणा आणि स्वप्नांचा प्रवास, आनंदाचा उत्सव या संदेशासह आयोजित या कार्यक्रमात आठवणींना उजाळा देत, शैक्षणिक व सहशैक्षणिक क्षेत्रातील यशाचा उत्सव साजरा करण्यात येणार असून उद्याच्या तेजस्वी विद्यार्थ्यांना दाद दिली जाणार आहे.

शुक्रवार, दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता अचूक शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण व फनफेअर आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नरसिंह ठाकूर, ज्येष्ठ प्रधान शास्त्रज्ञ व प्रमुख – केमिकल ओशनोग्राफी विभाग, सीएसआयआर – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अॅड. सौ. निर्मला सामंत प्रभवाळकर, माजी महापौर, मुंबई महानगरपालिका व माजी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग विराजमान राहणार आहेत.

तसेच या सोहळ्यास मा. श्री. इरशाद शेख, उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग विद्या निकेतन आणि मा. श्री. प्रशांत नेरूरकर, संचालक, सिंधुदुर्ग विद्या निकेतन हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

रौप्य महोत्सवाचा दुसरा दिवस शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता अचूक शाळेच्या प्रांगणात वार्षिक स्नेहसंमेलन व फनफेअर आयोजित करण्यात आले आहे.
या संपूर्ण सोहळ्याचे नेतृत्व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा लॉरेन्स डिसोझा यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून चि. मिहीर राजेश रावळ व कु. पूर्वा पांडुरंग कवळे हे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार आहेत.

शाळेच्या २५ वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा साक्षीदार होण्यासाठी वेंगुर्ला परिसरातील पालक, माजी विद्यार्थी व नागरिकांनी या रौप्य महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा