दीपक नारकर यांना अधिकृत उमेदवारी
कुडाळ :
जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घावनळे जि. प. विभागात राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेकडून दीपक नारकर यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली असून, या निर्णयामुळे विभागातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे.
दीपक नारकर हे शिवसेनेचे विद्यमान तालुकाप्रमुख असून त्यांनी यापूर्वी कुडाळ पंचायत समिती सदस्य म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि जनतेशी थेट संवाद ही त्यांची ओळख मानली जाते.
त्यांच्या उमेदवारीमुळे घावनळे विभागातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षाची ताकद आणि स्थानिक पातळीवरील अनुभव यांचा मेळ साधत नारकर यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केल्याचे चित्र दिसत असून, या विभागातील लढत अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
