You are currently viewing जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार
Oplus_16908288

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार

नाराजी तात्पुरतीच, कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही; मंत्री नितेश राणे

कणकवली :

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा ‘३१–१९’ फॉर्म्युला अंतिम करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अधिकृतपणे युती जाहीर झाली असून या निवडणुकीत महायुती एकत्रितपणे लढणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या निवडणुकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागावाटपाबाबत स्पष्ट दिशा ठरली असून, महायुती म्हणूनच निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा ठाम विश्वास राणे यांनी व्यक्त केला. जागावाटपामुळे काही ठिकाणी नाराजी दिसून येत असली, तरी ती तात्पुरती असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, “भाजपचा कार्यकर्ता हा राष्ट्र प्रथम, नंतर पक्ष आणि शेवटी मी या विचारधारेने काम करतो. प्रत्येकामध्ये निवडणूक लढवण्याची क्षमता आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार आहेत.”

पालकमंत्री म्हणून आपण सातत्याने जिल्ह्यात फिरून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत असल्याचे सांगत, ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांच्याशी संवाद साधून नाराजी दूर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. “नाराजी ही कायमस्वरूपी नसते. आज संध्याकाळपर्यंत चित्र अधिक स्पष्ट होईल,” असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, ठाकरे गटाबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, दरम्यान ठाकरे गटाचा समचारही त्यांनी घेतला असून, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल आणि तो हिंदी व मराठी भाषिकांचा असणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राणेंना संपवण्याच्या घोषणा करणारेच आज मातीमोल झाले असल्याचे सांगत, ठाकरे सेना स्वतःचा नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षही बसवू शकली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

भाजपमध्ये पक्षप्रवेशाबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, भाजपात प्रवेश केल्यास फायदे निश्चितच मोठे आहेत. मात्र केवळ फायदा नसलेला प्रवेश टाळून, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. कार्यकर्ते डिस्टर्ब होणार नाहीत, यावर पक्षाचे लक्ष राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सत्तेतील सर्व पदे कार्यकर्त्यांसाठी खुली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत प्रत्येकी पाच स्वीकृत सदस्य घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे कुणालाही नाराज होण्याची गरज नाही, असे राणे यांनी सांगितले.

रविवारी भाई सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले की, भाई सावंत हे कडवे व निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांना पुन्हा पक्षात ताकदीने उभे केले जाईल. त्यांच्या मतदारसंघात दोन जागा शिवसेना लढवणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा