जागावाटपाच्या घोषणेनंतर अवघ्या काही तासांत ओरोस मंडळाध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंतांचा राजीनामा
सिंधुदुर्ग :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर होताच भाजपमध्ये अस्वस्थतेची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर केला. मात्र या घोषणेनंतर काही तासांतच भाजपमधील एक महत्त्वाचा पदाधिकारी पदत्याग करत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस मंडळाचे अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा पत्रात त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून कार्य करणे योग्य वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या निर्णयामागे कोणत्याही नेत्याबाबत नाराजी नसल्याचे नमूद करत, आपला राजीनामा तात्काळ स्वीकारावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
हा राजीनामा त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर केल्याची माहिती पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महायुतीच्या जागावाटपानंतर भाजपमध्ये सुरू झालेल्या या घडामोडींमुळे पक्षांतर्गत समीकरणे बदलत असल्याचे संकेत मिळत असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात आणखी राजकीय हालचाली वेग घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
