*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*तुझ्या असण्याने*
तुझ्या असण्याने घर किती बोलकं होतं हे तू सासरी गेली तेव्हाच कळलं…. शिकायला बाहेरगावी रहालीस पण अधेमधे तुझं येणं वळवाच्या पावसागत मन चिंब भिजवायचं.
तुझं बालपण..बोट धरून चालवणं,फुलं, चांदोबा,तारे दाखवत,चिऊचा काऊचा घास भरवून तुला जेवू घालणं…नीज आली की हलकेच पाळण्यात घालून हळूवार थोपटून, गुणगुणत, झुलवत तुला झोपवणं….
तुझी भातुकली बघताना किती आनंद होई, पुस्तकातील चित्र दाखवत बरोब्बर ओळखलं की मीच आनंदून टाळी वाजवायची…
शाळा,वरचे वर्ग अभ्यास शिकवणी वर्ग तू कधी व्यस्त होत गेलीस कळलच नाही.मी मात्र तुझ्यातील सगळे बदल कौतुकाने बघत होती,
कळीचं फूल होताना,सुरवंटाचं रंगीत स्वच्छंदी फुलपाखरू होताना.. ते बदल विस्मयकारी, स्वप्नाळू…..
. कलागुणांना ही तू वेळ द्यायचीस.जमेल तसं शिकत सुंदर कला प्रस्तुती मनाला मोहून घेई.गायन,वादन, चित्रकला,व खूप काही आवडीचं …अभ्यास करून करतांना तुमची तारांबळ व्हायची पण कलेची उपजत आवड पूर्ण करायचीस….
शिकत असताना पाहुण्यासारखी घरी आली तरी
तू याच घरात मोठी झाली होतीस,आल्या आल्या घर अंगण फिरून तू घराचा आनंद घ्यायचीस…
आता मात्र लेक परक्याचे धन होणार..ही भावना काळजात कळ आणायची…पण तुझं घर , स्वतंत्र अस्तित्व, स्वाभिमान तुला खुणावणारच.देखणा, उच्च विद्याविभूषित,सुस्वभावी वर तुला शोभणाराच!
आता तुझ्या डोळ्यातील तो आनंद, प्रसन्नता मी निरखते.
अंगभर सौख्य ल्यालेली लेक बघून
मन भारावून जातं…
कुठेही रहा ..पण अशीच सौख्यात रहा,आनंदात गा.. असं मनोमन म्हणत मी नजरेनेच तिची दृष्ट
काढते…..
खरंच तुझ्या असण्याने झालेला आनंद अनमोल आहे….
ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करून
हळूच मी मायेचा हात तुझ्या पाठीवर फिरवते…दोघींचे डोळे आनंदाश्रूंनी भरून वाहू लागतात….!
अरुणा दुद्दलवार @✍️
