*सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास! – डाॅ. श्रीपाल सबनीस*
*नारायण सुर्वे काव्यजागर संमेलन संपन्न*
पिंपरी
‘नारायण सुर्वे यांचे जीवन म्हणजे वेदनेचा प्रवास होय! जिल्हा परिषदेच्या शाळेला आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करून देणारे दत्तात्रय वारे हे सर्वार्थाने आदर्श शिक्षक आहेत; परंतु सरकार संवेदनशीलता विसरली होती!’ अशी खंत ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी जिल्हा परिषद शाळा, जालिंदरनगर, कनेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी व्यक्त केली. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित एकदिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतीश गोरडे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल वाघ, स्वागताध्यक्ष श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जालिंदरनगर येथील जिल्हा परिषद शाळेला पद्मश्री नारायण सुर्वे संस्कारक्षम शिक्षण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर शिक्षणतज्ज्ञ अश्विनी गोरे (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान), संस्कारक्षम गृहिणी संजीवनी डोंगरे (मास्तरांची सावली – कृष्णाबाई सुर्वे सन्मान), मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस पुरस्कार), शिक्षिका रोहिणी दौंडकर (पद्मश्री नारायण सुर्वे शिक्षकप्रतिभा पुरस्कार), कवी संदीप वाघोले (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) यांना प्रदान करून गौरविण्यात आले. संतोष गाढवे (‘मातीतून उगवलेल्या कविता’)
आणि आकाश भोरडे (‘झालं बाटुकाचं जिणं’) यांच्या साहित्यकृतींना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यापूर्वी, संगीता झिंजुरके, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, प्रभाकर वाघाले, रजनी कानडे आणि सन्मानार्थी कवींनी नारायण सुर्वे यांच्या कवितांचे अभिवाचन करीत काव्यजागर केला.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘प्रयोगशील, कृतिशील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या दत्तात्रय वारे यांनी केवळ तीन विद्यार्थी राहिल्याने बंद होण्याच्या मार्गावरील जिल्हा परिषदेच्या या शाळेची पटसंख्या वाढवून एका वर्षात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त करून दिली. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात ‘वारे पॅटर्न’ राबविण्यात यावा!’ ॲड. सतीश गोरडे यांनी, ‘वारे सरांची शाळा ही कनेरसर गावाचे भूषण आहे!’ असे गौरवोद्गार काढले. डॉ. विठ्ठल वाघ यांनी, ‘या डोंगराळ अन् उजाड प्रदेशात वारेगुरुजी यांनी शिक्षणाचे नंदनवन फुलवले आहे!’ अशी प्रशंसा करीत उपस्थितांच्या आग्रहास्तव ‘काळ्या मातीत मातीत…’ या आपल्या सुप्रसिद्ध कवितेचे गायन केले. सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय वारे यांनी, ‘मराठी शाळा सक्षम झाल्या तर मराठीची चिंता करण्याची गरज भासणार नाही!’ असे मत व्यक्त केले. लालासाहेब जगदाळे यांनी, ‘मराठी शाळा कुठेही कमी नाहीत!’ असा विश्वास व्यक्त केला.
बालविद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षपूजन आणि कामगारभूषण राजेंद्र वाघ यांच्या ‘डोंगरी शेत माझं गं…’ या नारायण सुर्वे लिखित कवितेच्या सादरीकरणाने सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. अरुण गराडे यांनी प्रास्ताविकातून पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे नियोजन असून हे त्यातील चौथे पुष्प आहे, अशी माहिती दिली. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी नारायण सुर्वे यांचा जीवनपट कथन करीत, ‘सुर्वे यांनी कामगार साहित्य चळवळीचा पाया घातला!’ असे मत व्यक्त केले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी सन्मानार्थींशी हितगुज करीत त्यांच्या भावना जाणून घेतल्या. इंद्रजित पाटोळे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. मानसी चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले. राजू जाधव यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
