You are currently viewing ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट; उदय सामंत–नारायण राणे संवाद

ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट; उदय सामंत–नारायण राणे संवाद

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक राणेंच्या नेतृत्वाखाली लढवणार – कणकवलीत उदय सामंत यांची ठाम भूमिका

 

कणकवली :

शिंदे शिवसेनेचे नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट भूमिका मांडत, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालीच लढवण्यात येतील, असे ठामपणे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीतील समन्वय अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने ही भेट निर्णायक ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

ओम गणेश निवासस्थानी झालेल्या या भेटीप्रसंगी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार, अजित गोगटे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, महिला अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते, शिवसेना नेते संजय आग्रे, संजू परब यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सदिच्छा भेटीमुळे कणकवलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय हालचालींना नव्याने वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा