You are currently viewing जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न

५.९९ लाख मतदार बजावणार मतदानाचा हक्क

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक घोषित झाली आहे. जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद गट व १०० पंचायत समिती गणांसाठी सुमारे ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी सांगितले.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनुषंगाने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व समित्यांचे गठन करण्यात आलेले असून सर्वच समित्या आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून कार्यरत आहेत. जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना घ्याव्या लागणाऱ्या परवानग्या अधिक सुलभ होण्यासाठी एक खिडकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार सर्व समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने देखील आवश्यक ती खबरदारी घेतली असल्याचेही त्या म्हणाल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की , राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार FST, SST पथके तैनात करण्यात आली असून पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती कार्यवाही करत आहे.

१६ ते २१ जानेवारीदरम्यान नामनिर्देशन अर्ज

नामनिर्देशन अर्ज १६ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत स्वीकारले जाणार आहेत.

तालुकानिहाय नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत –

वैभववाडी (पंचायत समिती सभागृह), कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग (संबंधित तहसीलदार कार्यालये).

मतदारसंख्या व प्रशासकीय तयारी

अंतिम मतदार यादीत ३,०१,९०३ पुरुष, २,९७,६६० महिला व १ इतर मतदार असा समावेश आहे. निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुकानिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, खर्च नियंत्रण, तक्रार निवारण, ईव्हीएम व्यवस्थापनासाठी स्वतंत्र समित्या कार्यरत करण्यात आल्या आहेत.

सीमावर्ती भागात कडक नजर

गोवा सीमावर्ती भागासह प्रमुख मार्गांवर १० चेक पोस्ट कार्यान्वित करण्यात आले असून शस्त्र परवाने, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलीस प्रशासनाची करडी नजर आहे. शांततापूर्ण, निर्भय आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा