सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद येथे स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपचे अॅड. सिद्धार्थ भांबुरे आणि शिंदे शिवसेनेच्या अॅड. नीता सावंत – कविटकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
निवड जाहीर होताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष करत नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अभिनंदन केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे आणि विनोद राऊळ यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर तसेच स्वीकृत नगरसेवक अॅड. सिद्धार्थ भांबुरे यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.
यावेळी नगरपरिषद कर्मचारी संघटनेतर्फे देविदास आडारकर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच वकील संघटनेच्या वतीनेही अॅड. निरवडेकर आणि अॅड. भांबुरे यांचे अभिनंदन करण्यात आले. बिनविरोध निवडीमुळे नगरपरिषदेत समन्वयाने कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
