You are currently viewing जिल्ह्यात भारतीय संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे अधिसूचना जारी

जिल्ह्यात भारतीय संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे अधिसूचना जारी

जिल्ह्यात भारतीय संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे अधिसूचना जारी

सिंधुदुर्गनगरी

 जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या मालमत्ताधारकांनी/घरमालकांनी त्यांच्या मालकीचे घर, फ्लॅट, दुकान, मोकळी जागा/मालमत्ता इत्यादी परजिल्हातील/परराज्यातील/परदेशातील व्यक्तींना भाडे तत्वावर देणे, पोटभाडेकरू ठेवणे याबाबत परिपूर्ण माहिती जसे, भाडेकरुचे नांव, संपूर्ण मूळ पत्ता, व्यवसाय, सध्याचा पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्राची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे प्राप्त करून संबंधित स्थानिक पोलीस विभागाने मागणी केल्याप्रमाणे त्यांना सदरची माहिती विनाविलंब उपलब्ध करून द्यावी.

तसेच बागायतदार, बांधकाम व्यवसायिक, खाण मालक, हॉटेल / रिसॉर्ट / होमस्टे इत्यादीचे मालक/चालक, भंगार व्यवसायीक तसेच विविध व्यवसाय करणारे व्यवसायिक, व्यापारी, संस्थाचालक व मालक, दुकानदार, कंत्राटदार/ठेकेदार यांनी त्यांच्याकडे कामासाठी असलेल्या ठेवलेल्या/राहणा-या बाहेरील परजिल्हयातील, परराज्यातील/परदेशातील कामगारांची परिपूर्ण माहिती जसे  कामगाराचे नांव, संपूर्ण मूळ पत्ता, व्यवसाय, सध्याचा पत्ता, ओळखपत्राची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे ७ दिवसांत संबंधित स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तृत्पी धोडमिसे यांनी केले आहे.

        भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 प्रमाणे अधिसूचना जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आदेश जारी केला आहे. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये शिक्षेस पात्र राहील. पोलीस विभागाने उपरोक्त माहिती प्राप्त करून घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानिक पोलीस ठाण्यास विहीत नमुना उपलब्ध करून द्यावा, सदर आदेशाचा अंमल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३(४) नुसार आजपासून पुढील दोन महिन्याच्या कालावधीसाठी राहील, असे आदेशात नमूद करण्यात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आंबा/काजू बागा, बांधकाम व्यवसाय, मासेमारी बोटी, रिसॉर्ट हॉटेल होमस्टे, भंगार व्यवसायिक यांच्याकडे कामानिमीत्त मोठ्या संख्येने बाहेर जिल्हयातून, परराज्यातून कामगार कामानिमीत्त येतात. रबर, अननस, केळी इत्यादी बागायतीमध्ये काम करण्यासाठी केरळ, कर्नाटक, झारखंड, ओडीसा, छत्तीसगढ़ इत्यादी राज्यामधून मोठ्या संख्येने कामगार आणले जातात, तसेच आंबा बागायती, मासेमारीच्या कामासाठी पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्रप्रदेश राज्यातील व नेपाळ देशातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात आणले जातात. ते कामाच्या ठिकाणी रहातात किंवा भाडयाचे घरामध्ये रहातात. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार जिल्हयातील कोणीही घरमालक त्यांच्याकडे भाडयाने राहत असलेल्या भाडेकरु यांची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास कळवीत नाहीत तसेच कामासाठी असलेल्या कामगारांची माहिती त्यांचे मालक/कॉट्रक्टर स्थानिक पोलीस ठाण्यास कळवित नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे अपरिचित व्यक्ती (Stranger Persons) जिल्हयाच्या कार्यक्षेत्रात भाड्याने  राहत असल्यास/व्यवसाय करीत असल्यास त्यांची माहिती स्थानिक पोलीस व अन्य सुरक्षा यंत्रणांना वेळीच प्राप्त होत नाही, विविध गुन्हयामध्ये अनेकदा बाहेरील जिल्हयातील, परराज्यातील व्यक्ती आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले आहे. तसेच बांदा येथे ०३ घुसखोर बांग्लादेशी नागरीक बेकायदेशीर रित्या वास्तव्य करत असल्याचे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेवर कारवाई करण्यात आलेली आहे.

अशा अपरिचित व्यक्तींमध्ये देशविघातक अथवा समाजविघातक अपप्रवृत्तीच्या व्यक्ती छुप्यापध्दतीने राहत असल्यास राष्ट्रहिताच्या व समाजहिताच्या दृष्टिने ते घातक आहे. अशा व्यक्तीबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांना वेळीच समजणे निकडीचे आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतीच्या क्षेत्रात राहणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्यांच्या मालकीचे घर, फ्लॅट, दुकान, मोकळी जागा इत्यादी भाडे तत्त्वावर देणे, पोटभाडेकरु ठेवणे याबाबत परिपूर्ण माहिती (भाडेकरूचे नांव व संपूर्ण मुळ पत्ता, व्ययसाय, सध्याचा पत्ता, घरभाडे करारनामा, ओळखपत्राची छायांकित प्रत इत्यादी) संबंधीत पोलीस ठाण्यास विहित नमुन्यात द्यावी. तसेच बागायतदार, बांधकाम व्यवसायीक, खाण मालक, हॉटेल / रिसॉर्ट होमस्टे इत्यादीचे मालक/चालक, भंगार व्यवसायीक तसेच विविध व्यवसाय करणारे व्यवसायीक, व्यापारी, संस्थाचालक मालक, दुकानदार, कंत्राटदार/ठेकेदार यांनी त्यांच्याकडे कामासाठी असलेल्या ठेवलेल्या बाहेरील जिल्हयातील, परराज्यातील कामगारांची परिपूर्ण माहिती (कामगाराचे नाव व संपूर्ण मुळ पत्ता, व्ययसाय, सध्याचा पत्ता, ओळखपत्राची छायांकित प्रत इत्यादी) संबंधीत स्थानिक पोलीस ठाण्यास विहित नमुन्यात द्यावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

0000000

 

दोडामार्ग तालुक्याच्या कर्नाटक हद्दीवर हत्तीचा वावर नाही

शेतकरी व ग्रामस्थ यांनी घाबरु नये

–         उपवनसंरक्षक मिलिश शर्मा

सिंधुदुर्गनगरी दिनांक.१४ (जिमाका ) सद्यस्थितीत दोडामार्ग तालुक्याच्या कर्नाटक हद्दीवर हत्तीचा वावर नाही. तसेच सावंतवाडी वनविभाग देखिल कर्नाटक हद्दीवर लक्ष ठेवून आहे.त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील   शेतकरी व ग्रामस्थ यांनी घाबरु नये, असे आवाहन सावंतवाडी प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा यांनी केले आहे.

नुकतीच दोडामार्ग तालुक्यात कर्नाटक-दोडामार्ग सीमा भागात तब्बल 12 हत्तींचा मोठा कळप दाखल झाल्याची बातमी पसरली होती या पार्श्वभूमीवर वनविभागाचे एक पथक तात्काळ कर्नाटक हद्दीवर दाखल झाले. तेथे त्यांना हत्तीची कोणती हालचाल दिसून आली नाही यावेळी सदर पथकाने तेथील स्थानिक ग्रामस्थ व स्थानिक कोणा कर्मचारी यांच्याशी चर्चा करून हत्तीच्या हालचालीचे माहिती घेतली असता काही दिवसापूर्वी हत्तीच्या एका कळपाचा वावर हेवनहट्टी भागात होता त्यानंतर तो काळप बेलूर वरून दांडीलीच्या दिशेने निघून गेला आहे.

सद्यस्थितीत वन्य हत्तीमुळे होणारे शेतीपिकांचे व फळपिकांचे नुकसान कमी करण्यासाठी वन्यातील शेती व बागायती पासून दूर ठेवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सर्व वन कर्मचारी यांच्या सह हत्ती हकारा मजूर तसेच सावंतवाडी कुडाळ व आंबोली परिक्षेत्रतील अधिकचे वन कर्मचारी यांची नेमणूक करून वन्य हत्तींना नैसर्गिक अधिवासात ठेवण्याची कार्यवाही सावंतवाडी वन विभागातर्फे सुरु आहे. क्षेत्रीय स्तरावर सुमारे 100 पेक्षा जास्त मनुष्यबळ या कार्यवाहीत सामील आहेत.

हत्ती मानव संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागातर्फी हत्तीचा वावर असलेल्या भागांमध्ये हत्ती हकारा मजुरांच्या मदतीने रात्र दिवस गस्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर थर्मल ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून हत्तीच्या वावर असलेल्या स्थळांची माहिती मिळवून ती माहिती स्थानिक ग्रामस्थांना अलर्ट प्रणालीद्वारे देण्यात येत आहे.  तसेच चालू वर्षी दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रवण भागामध्ये सायरन अलर्ट सिस्टीम बसविणे काम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना हत्तीचा वावर मनुष्य वस्ती जवळ आढळून आल्यास सायरनद्वारे तेथील ग्रामस्थांना हत्तीच्या वावराबाबतची पूर्वकल्पना देण्यात येईल. यामुळे मानव वन्य हत्ती संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे. दोडामार्ग तालुक्यातील हत्ती प्रमाण भागांमध्ये हत्तीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे तात्काळ पाहणी व नुकसान भरपाई वन विभागाकडून वेळोवेळी देण्यात येत आहे. चालू वर्षी दोडामार्ग तालुक्यात हत्तीमुळे झालेल्या एकूण 374 प्रकरणी पीक नुकसानी बाबत नुकसान भरपाई देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर 5 जानेवारी 2026 रोजी सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण नारायण गवस यांनी हत्ती संबंधी विविध मागण्यांच्या अनुषंगाने सुरू केलेले ठिय्या आंदोलन दिनांक 8 जानेवारी 2020 रोजी स्थगित करण्यात आले असल्याची माहिती श्री. शर्मा यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा