You are currently viewing तिळगुळ घ्या…

तिळगुळ घ्या…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम ललितलेख*

 

*तिळगुळ घ्या…*

 

धुंधुरमास संपताच नवं वर्षातील पहिला सण गोडगोडुल्या पावलांनी नटून थटून अगदी आवडीने सणासुदीत काळा रंग वापरू नये म्हटलेल्या काळ्या साडीतच अंगावर सोन्या, मोत्याचे किंवा मग हलव्याचे दागिने घालून आपल्या आयुष्यात येतो अन् प्रत्येकाच्या मुखात अविरत तिळ अन् गुळाचा गोडवा सोडून जातो. हा एकता, पवित्रता आणि आरोग्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे मकरसंक्रांती..!

“तिळगुळ घ्या गोड गोड बोला”…..

मनात नसलं आणि असलं तरी मुखमंडळावर अनमोल असं सुंदर हास्य विलासित करून आपल्या घरच्यांना, जवळच्यांना, मित्रमंडळींना तिळगुळ देत “तिळगुळ घ्या…. असं आपण सहज बोलून जातो अन् वर्षातून एकदा दिलेल्या तिळगुळाची जाणीव ठेवून नेहमीच सर्वांनी आपल्याशी गोड बोलावे अशा अपेक्षा ठेवतो. आजकाल अशी अपेक्षा ठेवणे जरा अतिशयोक्ती देखील वाटेल परंतु…, आपल्या पूर्वजांनी सुरू केलेले रितीरिवाज भविष्यात आपल्या लेकरांनी देखील सुरू ठेवावे यासाठीचा हा अट्टाहास बरं का…! नाहीतर आजकाल मतदानापूर्वी राजकीय नेता सोडला तर कोण एवढं गोड बोलतोय..?

राजकारणी असल्यासारखेच फसवतात हल्ली तिळगुळ सुद्धा..! तोंडाने म्हणतात, तिळगुळ घ्या…अन् हातावर ठेवतात साखरेच्या पिठाचे पिरगळल्यासारखे वेडेवाकडे दिसणारे शुभ्र पांढरे दाणे.. तिळाचा आणि गुळाचा त्यात दूरदूर कुठे असतो का संबंध..? तरीही आपण मतदार असल्यासारखे वेडे बनतो अन् तिळगुळ म्हणून साखरेचे दाणे खातो, विकासाचे गाजर चघळल्याप्रमाणेच..! पण, त्यात असतात त्या तोंड गोड करण्याच्या मिठास भावना..! उद्देश एकच, मनातील, मुखातील कटुता नष्ट होऊन तोंडात गोड शब्द अन् नात्यात गोडवा यावा.

नाते तुमचे आमचे

हृदयी हळुवार जपायचे

तिळगुळाच्या गोडव्यासम

अधिक दॄढ करायचे….

मकरसंक्रांती म्हणजे तुमच्या आयुष्यात होणारी सुख समृद्धीची बरसात..नवीन आशा आणि आनंदाची उधळण करणारी, थंडीतही शरीराला उबदारपणा देणारी, मनाच्या गाभाऱ्यात मंद तेवणारी जणू फुलवात. गारव्यातही हा उबदारपणा अंगात टिकवून ठेवण्यासाठीच तर साजरा केला जातो मकरसंक्रांतीचा अनोखा सण. या निमित्ताने जवळ आणली जातात दुभंगलेली मने, तुटत चाललेले संवाद, दुरावलेली नाती, माणुसकीच्या संवेदना आणि पिढी पिढीतील अंतर..!तिळ (तीळ) आणि गुळ (गूळ) हे मकर संक्रांतीच्या सणांचे अविभाज्य घटक आहेत. तिळाचे आणि गुळाचे संयोजन खोल सांस्कृतिक आणि पौष्टिक महत्त्व धारण करते. थंडीच्या गारठ्यात आल्हाददायक वातावरणात रममाण होऊन पौष्टिक खाण्याकडे आपला काहीसा दुर्लक्ष होतो. पावसाळ्यात वाट्टेल ते खाल्ल्याने शरीराचा असमतोल बिघडतो… अन् हिवाळ्यात प्रतिकारशक्ती कमकुवत होते..त्यामुळे सूक्ष्मजीव नकळत आपल्या पोखरलेल्या नाजूक शरीरावर आक्रमण करतात आणि ऐशोआरामात जगण्याची सवय लागलेलं आपलं शरीर सूक्ष्मजीवांच्या हलक्याशा हल्ल्याने गलितगात्र होतं. सर्दी, खोकला, फ्ल्यू सारख्या रोगांचा सामना करण्याची आपल्यावर वेळ येते. अशावेळी छोटे छोटे तिळ आपलं सर्वस्व गुळाच्या पाकात अर्पण करतात अन् गरम गरम पाकात तावून सुलाखून निघाल्यावर आपल्या अनुभवाचे बोल मूकपणे मनुष्याला चघळून चघळून सांगतात आणि तिळगुळ चघळलेल्या शरीराला त्याचं महत्त्व पटवून देतात. शेवटी अनुभवाशिवाय माणूस काहीच शिकत नाही हे देखील कृतीतून दाखवून देतात.

तिळाचे गुळाशी झालेले मिलन अन् त्यातून मिळणारे शारीरिक, आरोग्यदायी फायदे हेच तर खरं कारण आहे मकरसंक्रांती साजरी करण्यामागे..! प्रमाणात गुळाचे सेवन केलं तर वजन घटविण्यास मदत होते पण अतिरिक्त सेवन मात्र वजन वाढविते.. अर्थात “अती तिथे माती” हे काही नव्याने सांगायला नकोच ना..!

तिळ मात्र आपले सद्गुण जपून वावरतात बरं का..! त्यात असलेल्या औषधी गुणधर्मांच्या फॅट्समुळे ते हृदयासाठी वरदान ठरले आहेत. उच्च फायबर्स पातळी असल्याने ते पचनास मदत करतात आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात. कॅल्शियम स्रोत असल्याने दूध न आवडणाऱ्यांसाठी कॅल्शियम पूर्ततेसाठी उत्तम पर्याय असून हाडांचे आरोग्य राखण्यास ते मदत करतात.

 

कणभर तिळ मणभर प्रेम

गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा..

ऐक्य आणि प्रेम वाढविण्याच्या मूळ उद्देशाला सफल करताना आपापसातील वैर विसरून स्नेह आणि प्रेम वाढवण्यासाठी हा सण साजरा केला जातो. खरंतर आपल्याकडे स्त्रियांचा विशेष सण म्हणून मकरसंक्रांतीकडे पाहिलं जातं. हळदीकुंकू आणि वाटण्यासाठी वाण काय घ्यायचं हा जणू संसदेत एकमेव शिल्लक असलेला प्रश्न असल्याप्रमाणे स्त्रिया त्यावर विचारविमर्श करतात. काहीजणी “मी हे यापूर्वी वाटलं आहे, आता दुसरं काहीतरी घ्यायचं” अशा विचारात मग्न होतात तर अलीकडे आलेला प्रेस्टिज म्हणा किंवा स्टेटसचा प्रश्न काहींना खूपच सतावतो. मग, मैत्रिणीने किंवा मंडळातील सहकारीने, शेजारणीने वाटलं त्यापेक्षा महागडं घेण्याच्या नादात आपलं महिन्याचं बजेट कोलमडून टाकतात. पण…, तरीही स्त्रिया एकमेकांना सुगडी भरून वाण देतात, ज्यात तीळ, हळद, कुंकू, फुले, धान्य, स्टील भांडे, विविध वस्तू, साबण, अगरबत्ती, साखर, पोहे काही विचारू नका…काहीजणी तर जगावेगळे हळद, मसाले, काड्यापेटी बॉक्स देखील देतात आणि एकदाची हौसमौज करून घेतात. अलीकडे नवीन ट्रेंड आलाय…

घरी आलेल्या सव्वाष्ण बायकांना आईसक्रीम, फ्रूट कस्टर्ड, थंडपेय, मसालेदूध सोबत समोसा, वडा काही बोलण्याची सोय नाही… ज्याचे त्याचे नियोजन वेगवेगळे आणि स्टेटस सांभाळण्यासाठीचे भलते सलते उद्योग..! पण.., बऱ्याच जणी आजही पारंपरिक पद्धतीने हळदीकुंकू समारंभ करतात. दारात सुबक रांगोळी काढून मन प्रसन्न करून टाकतात. साधीच पण गृहपयोगी वस्तू वाण देऊन अनेक चेहऱ्यांवर समाधानाचे हास्य फुलवतात. अशा हळदीकुंकवाने स्त्रियांची एकजूट वाढते. कधी नव्हे ते अनेक स्त्रियांचे गोरगरिब, श्रीमंतांच्या दारी पाय लागतात. प्रेमाची, आपुलकीची भावना वाढीस लागते, नाते संबंध सुधारतात, स्त्रियांचे अनेक विषय, साधेसाधे प्रश्न सुद्धा चर्चा, संवादांतून आपोआप मिटले जातात..

हा मकरसंक्रांतीचा सण शेतात आलेल्या नवीन धान्याच्या कापणीचा आणि आनंद साजरा करण्याचा सण असेही मानले जाते. अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा आहे, जे शौर्य आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. एकंदर मकरसंक्रांतीने होणारी वर्षाच्या सणांची सुरुवात तिळगुळ वाटून “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत गोडव्याने होते…

 

🖊️ दीपक पटेकर (दीपी)

सावंतवाडी, सिंधुदुर्ग

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा