You are currently viewing जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृत कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान

मुंबई:

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केला असून, त्यामुळे ग्रामीण राजकारणात मोठी हालचाल सुरू झाली आहे. “मिनी विधानसभा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. मतदारांसाठी १ जुलै २०२५ रोजीची अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे असे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांच्याकडून जाहीर करण्यात आले.

या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदांसह राज्यातील एकूण १२ जिल्हा परिषदांसाठी आणि १२५ पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे.

प्रत्येक मतदाराला पंचायत समितीसाठी एक आणि जिल्हा परिषदेसाठी एक अशी दोन मते देण्याची संधी असणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण राज्यात आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.

जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रम कसा असेल ते जाणून घ्या

उमेदवारी अर्ज दाखल दिनांक – १६ जानेवारी ते २१ जानेवारी

अर्ज छाननी – २२ जानेवारी

अर्ज परत घेण्याची दिनांक – २७ जानेवारी दुपारी ३ पर्यंत

चिन्हवाटप – २७ जानेवारी दुपारी ३:३० नंतर

प्रचार अंतिम दिनांक – ३ फेब्रुवारी संध्याकाळी ५ पर्यंत

मतदान – ०५ फेब्रुवारी सकाळी ७:३० ते ०५:३०

मतमोजणी – ०७ फेब्रुवारी सकाळी १० नंतर

ग्रामीण भागातील सत्तेची दिशा ठरवणाऱ्या या निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि नेतृत्व याभोवती ही लढत रंगणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आगामी काही दिवसांत प्रचाराला वेग येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात राजकीय वातावरण तापणार हे निश्चित मानले जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा