You are currently viewing निराधार महिलेच्या आयुष्यात मायेचा आधार

निराधार महिलेच्या आयुष्यात मायेचा आधार

निराधार महिलेच्या आयुष्यात मायेचा आधार

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व नगरसेवक देव्या सूर्याजी यांची संवेदनशील मदत

संविता आश्रमसारख्या सेवाभावी संस्थांमुळेच निराधारांना मिळतो नवा आधार

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात गेली सुमारे ३० वर्षे कामानिमित्त वास्तव्यास असलेले उडपी येथील एक दाम्पत्य शांतपणे जीवन जगत होते. मात्र, गेल्या वर्षी श्रीमती परवीन अझरुद्दीन शेख (वय ५५) यांच्या पतीचे आजाराने निधन झाले आणि मूल-बाळ नसल्याने त्या पूर्णतः निराधार झाल्या. पतीच्या निधनानंतर स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी मिळेल ते काम करण्यास सुरुवात केली. पण कालांतराने त्या स्वतः आजारी पडल्या.
आजारपणामुळे काम मिळेनासे झाले, राहत्या खोलीचे भाडे थकले आणि अखेर नाईलाजाने त्यांना खोली खाली करावी लागली. त्यानंतर त्यांच्यावर अक्षरशः रस्त्यावर राहण्याची वेळ आली. जवळपास एक महिना त्यांनी रस्त्यावर काढला. पुढे एका दुकानाच्या बाजूला त्या झोपू लागल्या.
ही परिस्थिती नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे व समीरा खलील हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. महिलेची विचारपूस करताच ती भावूक होऊन रडू लागली. तिची प्रकृती खालावलेली असून तीव्र ताप असल्याचे आढळले. रूपा मुद्राळे व हेलन निबरे यांनी तिला धीर देत सावरले.
तिला कोणताही आधार नसल्याची जाणीव झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तातडीने निर्णय घेतला. नगरसेवक देव्या सूर्याजी, सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश प्रभू तसेच सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या ज्योती दूदवाडकर मॅडम यांच्या सहकार्याने त्या महिलेला अणावं (पंदूर) येथील ‘जीवन आनंद’ आश्रमात दाखल करण्यात आले. त्यामुळे तिच्या पुढील आयुष्यासाठी सुरक्षित आणि मायेची सावली उपलब्ध झाली.
आश्रमात जाताना त्या महिलेचे शब्द सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले— “तुमची मी खूप आभारी आहे. मला विसरू नका, पुन्हा एकदा तरी भेटायला या.” हे शब्द ऐकून ही हाक आपल्याच कुणाची तरी असावी, असा भास उपस्थितांना झाला.
या संपूर्ण प्रसंगातून ज्यांना कोणाचाही आधार नाही, अशा निराधार व्यक्तींना सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान खऱ्या अर्थाने आधार देते, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे संस्थापक संदीप परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा