You are currently viewing धुंदुरमास

धुंदुरमास

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*धुंदुरमास*

 

सध्या सर्वांचा आवडता थंडीचा ऋतू सुरु आहे त्या अनुषंगाने या ऋतू मध्ये येणाऱ्या व अनन्यसाधारण महत्व असलेल्या धनुर्मासाविषयी… या काळात सूर्य धनु राशीतून संक्रमण करतो म्हणून याला धनुर्मास असे म्हणतात. या मासाला धुंदुरमास

झुंझुरमास व शून्यमास असेही म्हणतात.. असे म्हणतात की दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंदुरमास देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच त्यांची पहाट असते…

इंग्रजी व मराठी कॅलेंडर मध्ये या महिन्याचा स्वतंत्र उल्लेख जरी नसला तरी या महिन्याला अनन्यसाधारण महत्व असून हा हेमंत व शिशिर ऋतू मध्ये येतो.. मराठी महिन्यानुसार मार्गशीर्ष व पौष मध्ये व इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबर मध्यापासून जानेवारी मध्यापर्यंत असतो.. या महिन्यास शून्यमास असेही म्हणतात कारण या मासात लग्नकार्य, प्रॉपर्टीची खरेदी इ.अशी अनेक शुभकार्ये करत नाहीत.. हा संपूर्ण महिना आपल्या देव देवतांचे प्रती अर्पण असतो.. सूर्योदयापूर्वी भल्यापहाटे ब्रम्हमुहूर्ता वर उठून स्नान करून देवांची पूजाअर्चा

आराधना ,भजन अशी आपापल्या परीने भक्ती करतात.. या महिन्यात विशेषकरून भगवान विष्णूची व श्रीकृष्णाची आराधना करतात.. इतकचं नाही तर वसुंधरेला व चराचराला जीवन व आरोग्य प्रदान करणारी देवता सूर्याचीही आराधना केली जाते…

तसेच अध्यात्माची आवड असणाऱ्या लोकांना आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तर हा पर्वणीचा काळ म्हणता येईल ..ब्राह्ममुहूर्तावर उठून मेडिटेशन, योग व प्राणायाम यासाठी हा अतिशय उत्तम असासकाळ आहे. पूर्वी लोक पहाटे उठून घराबाहेर पडून जवळच्या देवळात भजन कीर्तन यासाठी एकत्र जमत तर काही जण एकत्र जमून पहाटे वनभोजनास जात असत.. यावरून असं लक्षात येतं की पहाटे फिरावयास जाण्याला अतिशय महत्व दिले गेले आहे… जर ह्याचा शास्त्रीय दृष्टया विचार केला तर या महिन्यात पहाटेच्या वेळेला म्हणजेच ब्रम्हमुहूर्ताला ओझोन लेअर अतिशय शुद्ध असते.. शुद्ध ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते तसेच वातावरण प्रदूषणरहित ,आल्हाददायक व उत्साहवर्धक असते त्यामुळे पहाटे फिरावयास जाण्यास तसेच व्यायाम करण्यास अतिशय महत्व दिलेले आहे.. या गोष्टी चांगल्या

आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहेत नाही का…!

आता तुम्ही म्हणाल की इतक्या पहाटे उठून वनभोजनाची काय आवश्यकता आहे ? तर हा काळ अतिशय थंडीचा असतो व आपल्या शरीराला त्याची ऊर्जा कायम टिकवायची असते. आपणा सर्वांना या वाढलेल्या थंडीच्या कडाक्याला सामोरे जायचे असते त्यामुळे आपल्या शरीरातील जठराग्नी पहाटेच प्रज्वलित झालेला असतो म्हणजेच पहाटे लवकर भूक लागलेली असते त्यामुळे शरीराला उष्णतावर्धक व स्निग्ध पदार्थांची अतिशय आवश्यकता असते..

या ऋतूमध्ये मिळणाऱ्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्त्व फार आहे.. हे खाणं इतर ऋतूंमध्ये पचायला जड असलं तरी या महिन्यात-या ऋतूमध्ये मात्र राजस मानलं गेलं.. वर्षभर खाण्यातून मिळणारी एनर्जी आपल्याला फक्त या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते एवढं याचं प्रचंड महत्त्व पूर्वजांकडून सांगितलं गेलं आहे…

मग अशावेळी या काळात तीळ लावलेली बाजरीची भाकरी त्यावर लोणी ,भरली वांगी, लेकुरवाळी भाजी (वांगी ,फरसबी ,मटार ,हरबरा गाजर ,पावटा ,हुरड्याचे दाणे व हिरवी पालेभाजी ) तांदूळ व मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, तीळ व गूळ घालून केलेली गोड पोळी ( गुळपोळी) व त्यावर साजुक तुपाची धार असा पौष्टिक आहार या थंडीच्या काळात घेतात… तसेच तीळ,गूळ व शेंगदाणे याचा एकत्र करून केलेला लाडू ,मुगाचे लाडू व हळिवाचे लाडू खातात यामुळे आपले आरोग्य चांगले राहते..या सर्व पदार्थांचा नैवेद्य भोगीला सूर्याला दाखविला जातो व ह्या धनुर्मासाची सांगता केली जाते.. या काळात हुरडा खातात त्यासाठी विविध ठिकाणी हुर्डापार्टीचे ही आयोजन केले जाते.. अशाप्रकारे विविधप्रकारांनी धुंधुरमास साजरा केला जातो…

तुमचे आरोग्य असेच पौष्टिक पदार्थ खाऊन येणाऱ्या धुंधुरमासाचा लाभ घेऊन सुधृढ राहो…

 

लेखिका/ कवयित्री

संगीता कुलकर्णी– ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा