पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय सांगेली येथे सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न
सावंतवाडी :
सावंतवाडी तालुक्यातील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्य, गायन व लोककलेच्या कार्यक्रमांनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला. प्राचार्य अशोक कांबळे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या महोत्सवात महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान तसेच दक्षिण भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध नृत्यप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांवरील कलाविष्कार तसेच योगा सादरीकरणास उपस्थितांची विशेष दाद मिळाली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे शिक्षक व पालकांनी भरभरून कौतुक केले.
यावेळी बोलताना प्राचार्य अशोक कांबळे म्हणाले की, पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सांस्कृतिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. शिक्षणासोबत नृत्य, गायन व विविध कलांचे ज्ञान मिळणे तितकेच आवश्यक असून प्रशालेने कला व क्रीडा क्षेत्रात विविध पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण विकसित व्हावेत या उद्देशाने दरवर्षी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने करण्यात आली. यानंतर गणेश वंदना, राजस्थानी लोकनृत्य, मराठी लोकनृत्य, राधानृत्य, समूहनृत्य, मुकनाट्य, लावणी आदी विविध कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. महाराष्ट्राच्या लोककलेबरोबरच गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतीय रिमिक्स नृत्य, भरतनाट्यम यांसारख्या कलाविष्कारांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या विद्यालयात कथक, योगा, एआय, संगीत आदी विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जात असून त्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी योगा सादरीकरणही सादर केले. या महोत्सवात सहावी ते अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थितांकडून भरघोस दाद मिळाली.
महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोषकुमार यादव यांनी केले. सूत्रसंचलन सौख्या भूमि यांनी केले, तर आभार एमओडी श्रीमती प्राजक्ता यांनी मानले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे निवेदन सौख्या कांबळे, गायत्री पाटील, श्रेया वर्दम आणि श्रेया गवस यांनी केले.
