कणकवली
सिंधुदुर्ग जिल्हा गणेश मूर्तिकार संघ, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे जिल्हास्तरीय इको फ्रेंडली गणेश मूर्ती प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गणेशोत्सव हा जिल्ह्यातील सर्वात मोठा सण असून तो घरोघरी साजरा केला जातो. या सणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, गणेश मूर्तीचे पावित्र विसर्जना नंतरही अबाधित राहावे, म्हणून पाण्यात सहजगत्या विरघळणाऱ्या मुर्तीची प्रतिष्ठापना जिल्हा वासियांनी करावी. हा संदेश देण्यासाठी व भविष्यामध्ये पर्यावरण पूरक गणपती बनवणारा जिल्हा अशी जिल्ह्याची ओळख व्हावी, हा उद्देश ठेऊन ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत एकुण ९ बक्षिसे देण्यात येणार असून, प्रथम ११००० रोख, द्वितीय ७००० रोख, तृतीय ५००० रोख , तर उत्तेजनार्थ दोन बक्षिसे प्रत्येकी २१०० रोख, तसेच विशेष कौशल्यासाठी ४ बक्षिसे असून प्रत्येकी रोख ११०० रूपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत, तरी जिल्हावासियानी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.