*’परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद*
पिंपरी
‘परीक्षेला सामोरे जाताना’ या नि:शुल्क मार्गदर्शन शिबिराला शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी -२, लायन्स क्लब इंटरनॅशनल झोन ७, ८, ९ आणि पिंपरी – चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावीच्या (एस. एस. सी.) मार्च २०२६ मधील परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या या मार्गदर्शन शिबिरात लायन्स क्लब इंटरनॅशनलचे वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ श्रेयस दीक्षित, पिंपरी – चिंचवड महापालिका शिक्षणविभाग साहाय्यक आयुक्त ममता शिंदे, अध्यक्ष एमजेएफ प्रदीप कुलकर्णी, लायन्स क्लब झोन ७ चेअरमन हिरामण राठोड, झोन ८ चेअरमन मुकुंद आवटे, झोन ९ चेअरमन उज्ज्वला कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी श्रेयस दीक्षित यांनी, ‘आनंदाने आणि शिस्तीने पन्नास मिनिटांचा अभ्यास अन् दहा मिनिटांची विश्रांती हे सूत्र अंगीकारून अभ्यास केल्यास ताण जाणवणार नाही!’ असा कानमंत्र दिला. ममता शिंदे यांनी, ‘विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळून जो विषय कच्चा वाटतो त्यावर लक्ष केंद्रित करावे!’ असा सल्ला दिला. प्रदीप कुलकर्णी यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘आजचे विद्यार्थी देशाचे भावी नागरिक असून राष्ट्रउभारणीसाठी त्यांचे योगदान असणार आहे. त्यामुळे तीन वर्षांपासून लायन्स क्लबच्या वतीने ‘परीक्षेला सामोरे जाताना…’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. प्रतिवर्षी या उपक्रमाला वाढता प्रतिसाद मिळत आहे!’ असे गौरवोद्गार काढले. मान्यवरांच्या हस्ते प्रश्नपत्रिका संच आणि आयकाकी ॲप प्रणालीचे अनावरण करण्यात आले.
या मार्गदर्शन शिबिरात एसएससी बोर्ड सदस्य डॉ. सुलभा विधाते (शास्त्र), डॉ. जयश्री अत्रे (गणित) आणि अर्चिता मडके (एक्झाम टेक्निक्स) यांनी संबंधित विषयांबाबत विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत अनौपचारिक शैलीतून सुलभ मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांना नि:शुल्क सराव प्रश्नोत्तर संचाचे तसेच आयकाकी ॲप प्रणालीचे वितरण करण्यात आले. लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या या विशेष उपक्रमात परिसरातील एकूण वीस क्लबनी सहभाग घेतला होता. उपक्रम समन्वयक अनुजा करवडे यांनी सूत्रसंचालन केले. लायन्स क्लब पुणे फीनिक्सचे अध्यक्ष प्रसाद दिवाण यांनी आभार मानले.
– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२
