कर्नाटक सीमेवर १२ हत्तींचा कळप;
दोडामार्ग तालुक्यात भीतीचे वातावरण, वनविभाग अलर्ट
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यात आधीच सहा हत्तींच्या वावरामुळे शेती व बागायतींचे मोठे नुकसान झाले असताना, आता कर्नाटक सीमेवर तब्बल १२ हत्तींचा मोठा कळप दाखल झाल्याची माहिती समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. बुधवारी ही बाब स्पष्ट होताच शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्गच्या घाटमाथ्यावरील सीमाभागात हत्तींचा कळप असल्याच्या चर्चेला कर्नाटक वनविभागाने दुजोरा दिला आहे. दोडामार्ग वनविभागाच्या पथकाने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील कणकुंबी येथे भेट देऊन माहितीची खातरजमा केली असता, सध्या हा १२ हत्तींचा कळप जांबोटी पंचक्रोशीत वावरत असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटक वनविभागाने कणकुंबी व जांबोटी परिसरात ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोधमोहीम राबवली. मात्र, घनदाट जंगल आणि दिवसाची वेळ असल्याने हत्तींचा ठावठिकाणा स्पष्टपणे दिसून आला नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार, रविवारी हा कळप जांबोटी परिसरात दिसला होता.
दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील सहा हत्ती आधीच शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरले असून, सीमाभागातील १२ हत्तींपैकी काही हत्ती तालुक्यात शिरल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरी हा कळप दांडेलीच्या दिशेने जात असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रवासादरम्यान कळप विभागला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या पार्श्वभूमीवर दोडामार्ग वनविभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये आला असून, सीमाभागात गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच सीमेलगतच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, हत्तींच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
