राज्यस्तरीय सायकलिंग निवड चाचणीद्वारे युवा खेळाडूंना सुवर्णसंधी
१४–१५ वयोगटातील सायकलपटूंकरिता अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय चाचणी
मालवण
सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंग खेळाडूंसाठी राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी दि. १० व ११ जानेवारी रोजी वाडीया पार्क, अहिल्यानगर येथील क्रीडांगणावर होणार आहे.
१४ ते १५ वयोगटातील (जन्म वर्ष २०११ ते २०१२) मुला-मुलींना या चाचणीत सहभागी होण्याची संधी मिळणार असून, निवड झालेल्या खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करण्याचा मार्ग खुला होणार आहे. रोड सायकलिंग, ट्रॅक सायकलिंग आणि माउंटन बाईक (एमटीबी) या स्पर्धा प्रकारांसाठी ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
निवड चाचणीत मुलांसाठी १६०० मीटर धावणे, व्हर्टिकल जम्प व ब्रॉड जम्प, तर मुलींसाठी ८०० मीटर धावणे, व्हर्टिकल जम्प व ब्रॉड जम्प अशा चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या चाचण्यांतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
निवड प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या खेळाडूंना SAI तर्फे उच्च दर्जाचे प्रशिक्षण, निवासी सुविधा तसेच क्रीडा शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सहभागी खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला, गुणपत्रिका, आधारकार्ड व पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक आहे.
या निवड चाचणीत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले असून अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे सचिव अजय शिंदे (९४२२३९४१८६) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
