*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित आशावरून काव्यरचना*
गुणगुणते संध्याकाळ, चाफ्याचे गंधित गाणे
मज निष्कारण आठवती, शिशिरात गळाली पाने
©®गुरू ठाकूर
________________________
*निष्कारण द्वंद्व*
निष्कारण द्वंद्वात होतसे, दमछाक मम मनाची
प्रातःकाळी भूपाळी ऐकता, सुरावट विराणीची
पक्ष्यांची किलबिल मंजूळ, आभा पसरता उषेची
का अकारणच स्मरावी, कातरवेळ संध्येची
सोनकेशरी प्रकाश उधळीत, आली रम्य प्रभात
का याद यावी उगीच, किर्रर्र अवसेची रात
मंद झुळूक सुगंधी, फुंकर घाली हळुवार जखमेचा व्रण का हुळहुळतो, भूतकाळातील वार
पालवी साजरा करते, कौतुक सोहळा सृजनाचा
का सांगाडाच दृष्टीस पडतो, वठलेल्या वृक्षाचा
नवजात शिशूचा ट्यांहा, नांदी नवजीवनाची
का तेव्हाच ऐकू येते, घंटा तिसऱ्या अंकाची
काळीज कुपीत जपावे, या क्षणांना साजिऱ्या
का तळ डहुळुन येती, गूढ वेदना गहिऱ्या
सुरेल स्वरांनी जाहला, जीवन मैफलीचा मुहूर्त
मग का निष्कारण आळवावे,
भैरवीचे सूर आर्त
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©® या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत
_______________________
