*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*उतारवय: मैत्री.. वगैरे….*
तीनचार वर्षांपूर्वी एक बातमी वाचली. नव्वद वर्षांच्या वृद्धाने आत्महत्या केली. चिठ्ठीत लिहिले
होते, माझ्याशी बोलतील असे माझ्यासमवयस्क
कुणीही हयात नाहीत. माझ्याशी कुणीही बोलत नाही.मी कशासाठी जगायचे? माझ्याशी बोलायला कुणीही इच्छुक नाही. मी एकटा पडलो आहे.माझ्यासह सर्वांनाच माझा कंटाळा
आला आहे.
अतिशय हृदय हेलावणारी बातमी होती ती. विचार करायला लावणारी. जन्म व मृत्यू माणसाच्या हातात नाहीत. रोज रस्त्यावरच्या
अपघाताच्या बातम्या वाचतो. कुटुंबच्या कुटूंब
मृत्यूमुखी पडते. सारे तरुण असतात. अर्ध्या वयातच हे जग सोडतात या नियतीला काय म्हणावे?
“सायरस मेस्त्री” करोडोंचा मालक, करोडोंच्या
गाडीतून प्रवास करतांना रस्ता अपघातात लांब,
गवतावर मातीत पहुडलेला दिसतो याला काय
म्हणावे? एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचे
यशस्वी ॲापरेशन होऊन तो शुद्धीवर येण्याची
वाट पहात असतांनाच लक्षात येते की, त्याची
ॲाक्सिजनची नळी त्याच्याच अंगाखाली दबलेली
नर्सच्या लक्षात येत नाही व तो कधीच उठत नाही. वाटते, किती अशाश्वत आहे हे जीवन!
उद्या काय वाढून ठेवले आहे माहित नाही.एकिकडे जीवनाची ही अशाश्वतता तर
दुसरीकडे नव्वद वर्षांचे आयुष्य लाभूनही जीव
नकोसा होतो काय म्हणावे या नियतीला?..
जीवनाचे हे खेळ अनाकलनीय आहेत हे नक्कीच. पण आपल्या वाट्याला जे जीवन आले
आहे ते उद्या काय होईल हे माहित नसले तरी जीवात जीव असे पर्यंत ते सुखावह कसे होईल
हे बघणे आपले कर्तव्य आहे, स्वत:साठी व इतरां
साठी देखील. म्हणून वृद्धांसाठी आपण अधिक
सहानुतीसह वागले पाहिजे. पतीपत्नीपैकी एक
गेल्यानंतर जीवन एकाकी बनते विशेषत: पुरुषांसाठी जास्त. कारण स्त्री घरात असल्यामुळे
कायम कामात व्यस्त असते. घरकामात तिचा खूप वेळ जातो. त्यामुळे महिलांबाबत हे प्रश्न कमी उद् भवतात.
पुरुषमात्र एकाकी होतात. अशावेळी मित्रमंडळ
ते ही समवयस्क असेल तर प्रश्न बराचसा सुटू
शकतो. चार घटका उद्यानात वा क्लबमध्ये जाऊन मित्रांशी मन मोकळे केल्यास मनावरचा
ताण बराच कमी होऊ शकतो.शिवाय तुम्हाला
मन गुंतवता येईल असे छंद असणे फार महत्वाचे
आहे. पेपरवाचन, टी व्ही मनोरंजन, मोबाईलचा
वापर, जुने आवडीचे चित्रपट व सिरियल्स बघणे
हे ही आवश्यक आहे. कारण मित्र कितीही असले तरी ते चोवीसतास तुमच्याजवळ नसतात.
त्यामुळे मन गुंतेल अशा साधनांचा वापर तुम्ही
केला पाहिजे. खरे तर हेच तुमचे मित्र आहेत जे
चोविसतास तुम्हाला उपलब्ध आहेत. छंद मग ते
कोणतेही असोत, जीवन सुसह्य करतात. डोळे,
दृष्टी चांगली असेल तर वेळ कसा घालवावा हा
प्रश्नच रहात नाही.
मी पाहिलेली दोन उदा. सांगते. एक निवृत्त शिक्षक. पत्नी अकाली गेल्यावर विधवेशी लग्न
केले. छान चालले होते. बाई अगदी तुडतुडीत.
रोज दारावरून फिरायला जातांना दिसत. सर
एकदिवस चालतांना आमच्याच दारासमोर ठेच
लागून पडले. आम्ही सर्वांनी त्यांना सावरले. त्या
नंतर ते फिरतांना दिसले नाहीत. मग बाई रस्त्याच्या कडेकडेने एकट्याच येऊ लागल्या.
सडसडीत होत्या. खूप जगतील असे वाटत होते.
पण, हाय रे दैवा! एका दुकानाच्या पायऱ्या
चढतांना पडल्या व लगेच गेल्या. सर एकाकी पडले. मुले आहेत पण वेगळे राहतात. एक
दिवस भेटले, घरासमोर. मी चौकशी केली. कसे
आहात? बरा आहे म्हणाले. वेळ कसा जातो?
म्हणाले, रात्रभर आलटून पालटून सर्व सिरियल्स
बघतो. छान वेळ जातो. दिवसा पेपर वाचतो. इतर
कामात वेळ जातो.
अजून एक गृहस्थ आहेत. त्यांना निद्रानाश आहे.
बायको जाऊन खूप वर्षे झालीत. मुलगा सून जवळ आहेत. हे रात्रभर पुस्तके वाचतात.स्वत:ला
लागणारी खरेदी रिक्षा बोलवून स्वत: करतात,
आपल्या पेन्शन मधून. सर्व शौक पुरे करतात.
मजेत आहेत. एकटेपणा घालवायचा असेल तर
नुसते मित्र असून उपयोग नाही. तर आपण आपला वेळ कसा घालवायचा याचे नियोजन
आपणच करून जीवन आनंदी बनवले पाहिजे.
युरोपात आता असे क्लब निघाले आहेत की,
तुम्ही नवराबायको वा एकटे का असेना, दिवसभर त्या क्लबमध्ये बसू शकता. मनोरंजनाच्या साधनांसह सारे काही उपलब्ध
आहे. जेवणाची सोय आहे. काही करायचे नाही.
रात्री फक्त घरी जाऊन झोपायचे. वृद्ध मंडळी
आता अशा क्लबचा आश्रय घेऊ लागली आहेत.
किंवा मग आपले वृद्धाश्रम आहेतच. आता साऱ्या
सुखसुविधा हात जोडून समोर उभ्या आहेत. सारेच
समवयस्क असल्यामुळे मित्रही मिळू शकतात.
वेळ कसा घालवायचा याची साधनेही हात जोडून
समोर उभी आहेत. त्यामुळे म्हातारपण इतके कष्टाचे असण्याचे दिवस संपले असे म्हणू या.ज्यांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागली, कोणत्या का कारणाने असेना, त्यांनी दु:ख न
मानता परिस्थिती स्वीकारायला हवीच. त्याला
इलाज नाही.
जीवन अनमोल आहे. त्याचा आदर करून सुख
शोधण्याचाच व इतरांना सुख देण्याचा प्रयत्न करणे हेच जीवनाचे उद्दिष्ट असले पाहिजे, त्यातच मानवी जीवनाचे सार्थक आहे हे निश्चित.
वृद्धावस्थाही आनंदावस्था बनवता आली पाहिजे.
ही सारी माझी मते आहेत.
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
