सॉ मिल असोसिएशन अध्यक्षपदी निवडीबद्दल आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाकडून सत्कार
बांदा :
सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बांदा मराठा समाजाचे माजी उपाध्यक्ष व उद्योजक आनंद गवस यांचा बांदा मराठा समाजाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
आनंद गवस हे गेल्या अनेक वर्षांपासून सॉ मिल व्यवसायात कार्यरत असून, आपल्या अनुभव व कार्यकुशलतेच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हास्तरावरील नेतृत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याने बांदा परिसरासह संपूर्ण मराठा समाजात समाधान व अभिमान व्यक्त करण्यात येत आहे.
यापूर्वी त्यांनी बांदा मराठा समाज मंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
या सत्कारप्रसंगी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष विराज परब, माजी अध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव आनंद वसकर, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, अक्षय परब, प्रभाकर गावकर, माजी खजिनदार राकेश परब, जय पटेकर-सावंत, मनोज सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
