*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*उपाय काय?*
(चाल- नसतेस घरी तू जेव्हा – कवी संदीप खरे)
नसतो हाती तो जेव्हा
जीव घाबराघुबरा होतो
‘कराग्रे वसतो मोबाईल’
कसं म्हणावं प्रश्नच पडतो
नसतो हाती तो जेव्हा
आम्हीच दिला मुलांस
ते जेवत नसती जेव्हा
कार्टून बघत मग मस्त
घास गिळती ते तेव्हा
रोगाहून भयंकर ठरला
इलाज कसा हा छळतो
त्यांची मिठी लडिवाळ
सामोरी ढीग कामाचा
मोबाईल देता त्यांना
सोडला श्वास सुटकेचा
प्रश्नास तयार उत्तर,
बुध्दीचा वापर नसतो….
ही सवय त्यांस लावली
‘आ बैल मुझे मार’ केले
ते रमती त्यासवेच आता
खेळ, पुस्तकं वैरी झाले
नको सखे-सवंगडी कोणी
म्हणती घरामध्ये बसतो….
तळमळती व्यसनासक्त
जळाविण जैसा मीन
शरीर-मन पोखरती
पुढे भविष्य होईल दीन
समस्या संपूर्ण पिढीची
उपाय काही नच सुचतो
वरदान असे मोबाईल
जणू अल्लादिनचा जीन
उपयोगी सानथोरांस
परि तारतम्य राखुन
शापात नको रुपांतर
करजोडी प्रार्थना करतो
@भारती महाजन-रायबागकर, चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.
