You are currently viewing हिशोब
Oplus_16908288

हिशोब

*ज्येष्ठ कवी श्री मोहन मराठे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”हिशोब”*

 

पाप आणि पुण्याचा

हिशोब आहे द्यायचा

जैसे कर्म,तैसे फल हा

न्याय असे भगवंताचा. /१/

 

जन्मासंगे सुरु होई हा

वजा बाकी चा खेळ

उत्तर देण्या” चित्रगुप्तासी”

नाही क्षणाचा वेळ. /२/

 

चारित्र्यावर चरित्र घडते

कलंक किंवा सत्कीर्ती

विनाश काले, विपरीत बुद्धी

सुचता होई “अपकिर्ती”/३/

 

मनुष्य जीवन,असे आरसा

काचे सम “चारित्र्य” असे

कलंकाचे घाव त्यावरी

भग्न अवशेषी,काच जसे/४/

 

सकस ओल्या माती पोटी

वृक्ष अनेक जन्मती

अमृत वृक्षा स्विकारुनी,जन ते

विष वृक्षा छेदीती. /५/

 

नितळ निळ्याशा कूपामधले

उदक प्राशण्या योग्य असे

मलिनतेच्या भाळी केवळ

अस्विकृती चा शाप असे. /६/

 

फसवे क्षण हे,आयुष्याचे

मोह मायेचे भांडार

सदसद्विवेकबुद्धी नसता

दिव्या खालती अंधार. /७/

 

कर्म चाले संगती हा

सिद्धांत आहे नियतीचा

पाप आणि पुण्याचा

हिशोब आहे द्यायचा. /८/

 

 

रचना:— मोहन मराठे…..

प्रतिक्रिया व्यक्त करा