अमरावती :
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नामवंत शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक असलेल्या अमरावतीच्या श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचा अमृत महोत्सव ३, ४ व ५ जानेवारीला संपन्न झाला आहे. या अमृत महोत्सवा कार्यक्रमात संपूर्ण भारतातून तज्ञ मार्गदर्शक ज्येष्ठ उद्योगपती व ज्येष्ठ वक्ते यांना निमंत्रित करण्यात आले होते. या अमृत महोत्सवात मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक व मिशन आयएएस ह्या भारतव्यापी सुप्रसिद्ध चळवळीचे जनक तसेच श्री गणेशदास राठी छात्रालय समितीमध्ये वीस वर्ष विद्यार्थी म्हणून कर्मचारी म्हणून व प्राध्यापक म्हणून राहिलेले ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते व लेखक श्री प्रशांत पोळ व श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष श्री वसंतबाबू मालपाणी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे अमृत महोत्सवाचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अमृत महोत्सवानिमित्त उभारलेल्या भव्य अशा सभामंडपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.श्रीमती कमलताई गवई भारतातील सुप्रसिद्ध मालपाणी उद्योग समूहाचे सर्वेसर्वा व सुप्रसिद्ध वक्ते श्री संजय मालपाणी श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे सचिव डॉ. गोविंद लाहोटी सदस्य श्री ओम नावंदर तसेच श्री गणेशदास राठी छात्रालय समिती द्वारा संचालित श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भांगडिया हे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी १९६६ ते १९८५ या कालावधीत श्री गणेशदास राठी छात्रालय समितीमधील श्री गणेशदास राठी विद्यालय व श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय येथे विद्यार्थी कर्मचारी व मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. आज त्यांनी मिशन आयएएसच्या मार्फत विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार केले असून संपूर्ण भारतामध्ये त्यांनी आतापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित केल्याआहेत. याशिवाय त्यांनी एकंदर ७३ पुस्तके लिहून मराठी साहित्याच्या दरबारात अलौकिक भर घातलेली आहे.
महाराष्ट्रातील विविध सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक व स्पर्धा विषयक उपक्रमामध्ये सहभागी असलेले एक व्यक्तिमत्व म्हणून प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांचा नावलौकिक आहे. समारोपाच्या दिवशी झालेल्या या सत्कार समारंभाला श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे पदाधिकारी सदस्य अध्यापक कर्मचारी हितचिंतक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांना प्राप्त झालेल्या बहुमानाबद्दल मिशनचे अध्यक्ष श्री ज्ञानदेव मोडक उपाध्यक्ष श्री राजेंद्र इंगोले उपाध्यक्ष डॉ. रमेश गोटखडे सदस्य नंदकिशोर खडसे व सदस्य गौतम मोहोड यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
