You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्राला दिशा देणारी – सभापती प्रा. राम शिंदे
Oplus_16908288

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाची एकजूट महाराष्ट्राला दिशा देणारी – सभापती प्रा. राम शिंदे

‘दर्पण’ पुरस्काराला राज्यस्तरीय ओळख द्यावी; पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक गरजेची

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :

“सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने जपलेली एकजूट ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल अशी आहे. पत्रकारांमधील अशी संघटित ताकद राज्यात अन्यत्र क्वचितच पाहायला मिळते,” असे गौरवोद्गार विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले. पत्रकार दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितले की, ही भूमी सुसंस्कृत, मूल्यनिष्ठ आणि विकासाभिमुख पत्रकारितेची साक्ष देणारी आहे. या परंपरेचा गौरव अधिक व्यापक व्हावा, यासाठी जिल्हा पत्रकार संघाने आपल्या पुरस्काराचे नामकरण ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार’ असे करावे, जेणेकरून त्याला राज्यस्तरीय ओळख आणि प्रतिष्ठा मिळेल, अशी सूचनाही त्यांनी केली.

प्रा. राम शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार भवनाचे विशेष कौतुक केले. “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी राजकीय मतभेदांमुळे अशी भव्य वास्तू उभी राहणे कठीण जाते. मात्र सिंधुदुर्गात तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे खासदार नारायण राणे यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि ५.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानंतर विद्यमान पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही या वास्तूत मोलाची भर घातली. लोकप्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यातील हा समन्वय जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पूरक आहे,” असे ते म्हणाले.

‘दर्पण’ म्हणजे आरसा, समाजाला सत्य दाखवणारे माध्यम, असे सांगत त्यांनी आजच्या सोशल मीडिया आणि युट्यूबच्या युगात पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढल्याचे नमूद केले. अन्यायाविरुद्ध आवाज उठवतानाच प्रशासनातील त्रुटी सुधारण्यासाठी पत्रकारांची लेखणी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ‘विकसित भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी पत्रकारांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगत, “पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. तुमच्या माध्यमातून जाणारा संदेश समाजाला विकासाशी जोडतो,” असेही प्रा. राम शिंदे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या सोहळ्यास जिल्ह्यातील पत्रकार बांधव, राजकीय पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा