You are currently viewing प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

 प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) केवळ वैयक्तिक उद्योजकच नव्हे, तर शेतकरी संस्था आणि गटांसाठी ‘सामाईक पायाभूत सुविधा’ (Common Infrastructure CIF) उभारण्याची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या घटकासाठी प्रकल्प किमतीच्या 35 टक्के आणि जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत बँक कर्ज आधारित अनुदान दिले जात असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी दिली आहे.

सामाईक पायाभूत सुविधा (CIF) आणि अनुदानाचे स्वरूपः जिल्ह्यातील अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटी देण्यासाठी साठवणूक केंद्र, शीतगृह (Cold Storage), पॅकेजिंग केंद्र, किंवा प्रक्रिया केंद्र यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन मोठे आर्थिक पाठबळ देत आहे.

अनुदान मर्यादाः- एकूण बँक कर्ज आधारित पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्के, किंवा जास्तीत जास्त 3 कोटी रुपयांपर्यंत. पात्र संस्थाः– शेतकरी उत्पादक संस्था (FPO), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), सहकारी संस्था, स्वयंसहायता गट (SHG) आणि त्यांचे फेडरेशन तसेच शासकीय संस्था या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

वैयक्तिक व गट लाभार्थी आणि अनुदानाचे स्वरूपः-

अनुदान मर्यादाः एकूण बँक कर्ज आधारित पात्र प्रकल्प किमतीच्या 35 टक्के, किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत.

पात्र संस्थाः वैयक्तिक मालकी, भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), सहकारी संस्था, स्वयंसहायता गट (SHG), खाजगी कंपनी आणि NGO या योजनेचा लाभ घेऊ शकतात. विनामूल्य मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया :- या योजनेचा लाभ घेण्यासाठी सात-बारा नसला तरी तांत्रिक निकषांच्या आधारे पात्र होता येते. जिल्ह्यात 24 जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यासाठी आणि बँक कर्ज प्रक्रियेत मदत करण्यासाठी नेमलेले आहेत.

सिधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत 415 वैयक्तिक आणि 220 गट लाभार्थीचे व 5 सामाईक पायाभूत सुविधा केंद्र प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने काजू प्रक्रिया, आंबा प्रक्रिया, विविध प्रकारची पीठे, तेल घाणा, बेकरी उत्पादने, मसाला उद्योग, दुग्ध, मासे व सागरी उत्पादने, फळ प्रक्रिया आणि पापड निर्मिती यांसारख्या उद्योगांचा समावेश आहे.

सिधुदुर्ग जिल्ह्यात काजू, आंबा, कोकम यांसारखी फळे आणि मसाल्याच्या पदार्थाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परंतु त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग कमी आहेत. फलोत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि ग्रामीण युवकांना गावातच रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला बचत गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले हक्काचे उद्योग उभारावेत.

इच्छुक लाभार्थीनी अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग आणि जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP) यांना संपर्क साधावा. तसेच अधिकृत संकेतस्थळ www.pmfme.mofpi.gov.in  वर भेट देऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा