सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
पत्रकार दिनानिमित्त जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाचा भक्कम पाया रचला. त्याच धर्तीवर जिल्ह्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी आणि नागरिकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील आगामी विकासाबाबत बोलताना पालकमंत्री राणे म्हणाले की, पुढील काळात जिल्ह्यात अनेक मोठे विकास प्रकल्प उभे राहणार असून, त्यातून स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. चिपी विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सुरू झाली असून, कोल्हापूर–वैभववाडी रेल्वे मार्गासाठीही ठोस प्रयत्न सुरू आहेत. गोव्याच्या धर्तीवर सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत नेण्याचा संकल्प शासनाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.
पत्रकारांच्या कल्याणाबाबत शासन कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, सिंधु दर्पण पत्रकार गृहनिर्माण संस्थे’च्या माध्यमातून ओरोस येथे माफक दरात पत्रकारांना हक्काची घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत या भूखंडाचे हस्तांतरण होणार असून, ज्येष्ठ पत्रकार माधव कदम, संतोष वायंगणकर, उमेश तोरसकर, शशी सावंत, गजानन नाईक, बाळ खडपकर, संतोष राऊळ आदींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा पत्रकार भवन जसे आदर्श ठरले, तसेच हे पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पही आदर्श ठरेल. लवकरच पत्रकारांच्या हक्काच्या घरांच्या चाव्या त्यांच्या हातात असतील, असा विश्वासही पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार म्हणून देवगड – अयोध्याप्रसाद गावकर, कणकवली – सुधीर राणे, मालवण – अर्जुन बापर्डेकर, कुडाळ -प्रशांत पोईपकर, सावंतवाडी – सागर चव्हाण, वेंगुर्ला – प्रदीप सावंत, सिंधुदुर्गनगरी – लवू म्हाडेश्वर, दोडामार्ग – ओम देसाई, वैभववाडी – महेश रावराणे या नऊ पत्रकारांना मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक बाळ खडपकर यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश जेठे यांनी केले. आभार संतोष राऊळ यांनी मानले.
