You are currently viewing साहित्य संमेलन सातारा सुफल संपूर्ण…
Oplus_16908288

साहित्य संमेलन सातारा सुफल संपूर्ण…

*ज्येष्ठ कवी, गझलकार, समीक्षक श्री.विजय जोशी (विजो) यांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा घेतलेला आढावा*

 

*साहित्य संमेलन सातारा सुफल संपूर्ण…*

———————————————

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा दरवर्षी जानेवारी/फेब्रुवारी मध्ये साजरा होणारा साहित्यिक सांस्कृतिक सोहळा. या सोहळ्यात चिंब भिजून मनमुराद आनंद घ्यायचा आणि वर्षभरासाठी नवीन उर्जा घेऊन परतायचं… ही वारी नित्यनेमाने मी करीत आलो आहे…

 

तीन महिन्यापूर्वी ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा या नियोजित संमेलनाच्या तारखा घोषीत झाल्या आणि मी सालाबादप्रमाणे लगेचच जाण्या-येण्याचं तिकीट बूक केलं. यथावकाश प्रतिनिधी शुल्क भरून माझी संमेलन स्थळी निवास आणि भोजन व्यवस्था निश्चित केली आणि निश्चिंत झालो.

मी पूर्णवेळ संमेलनात उपस्थित राहून तिथल्या जास्तीत जास्त कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. यातून अभ्यास, मनरंजन, प्रबोधन, आनंद, समाधान… हे सारेच उद्देश सार्थ होतात.

 

आजवर गेली कित्येक वर्षे साहित्य संमेलन हे ३ दिवसांचे होत होते. पण हे ९९ वे संमेलन असल्याने महामंडळाने ४ दिवसांचे घ्यायचे ठरविले… खरंतर इथूनच या ९९ व्या संमेलनाचे वेगळेपण दिसायला सुरुवात झाली.

 

▪️ मुख्य उद्घाटन‌ सोहळा सोडला तर पहिल्या दिवशी ध्वजारोहण, ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन , कविकट्टा उद्घाटन, गझल कट्टा उद्घाटन, प्रकाशन कट्टा उद्घाटन, ग्रंथ दिंडी, साताऱ्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा सन्मान आणि स्थानिक संस्कृतीचे ‘बहुरूपी भारूड’ … असे कार्यक्रम झाले. हे सोपस्कार पहिल्याच दिवशी आटोपले गेले, त्यामुळे पुढील तीन दिवस उद्घाटनासोबत इतर अन्य कार्यक्रमांसाठी पुरेसा वेळ मिळाला.

 

▪️दुसऱ्या दिवशी मुख्य मंडपात भरगच्च गर्दीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला –

संमेलनाध्यक्ष मा.श्री.विश्वास पाटील, मा.श्री.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वागताध्यक्ष मा.श्री.शिवेंद्रसिंहराजे भोसले, महामंडळाचे अध्यक्ष मा.श्री.प्रा.मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष मा.श्री.विनोद कुलकर्णी, कार्यवाह मा.सुनिताराजे पवार…शिवाय माजी संमेलनाध्यक्ष श्रीमती तारा भवाळकर, उद्घाटक या नात्याने डॉ.मृदुला गर्ग… यांची उपस्थिती उल्लेखनीय होती. मिलिंद जोशी, देवेंद्र फडणवीस, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भाषणे लक्षवेधी ठरली.

उद्घाटन सोहळ्यात माईक सिस्टीमच्या तांत्रिक चुकीमुळे भाषणांवर थोडेसे विरजण पडले. भाषणे नीट ऐकू येत नव्हती. इको साऊंड सारखे दोन दोन आवाज येत होते. एवढ्या मोठ्या सोहळ्यात अशी तांत्रिक चूक अक्षम्यच.

संमेलन साताऱ्यात असूनही मा.श्री.उदयनराजे भोसले यांची अनुपस्थित नजरेत येत होती, खटकत होती. यामागे त्यांचे वैयक्तिक काही कारण होते की काही राजकीय कारण याबद्दल माहिती मिळू शकली नाही.‌ पण दबक्या आवाजात याची चर्चा सर्वत्र होताना दिसली.

 

‘तुमची आचार संहिता असेल तर आमची विचार संहिता आहे.’

‘आईच्या दुधावर वाढलेलं बाळ जसं सशक्त होत असतं… तसं आपल्या मायबोलीच्या शब्दांवर वाढलेलं बाळ बुद्धीमान आणि बलवान बनतं. हिंदी, इंग्रजीला आमचा विरोध नाही, पण मराठी शाळा बंद होता कामा नये. एक जरी मुलं वर्गात असेल तरी शाळा सुरू राहीली पाहिजे. कारण कोण जाणे, ते मुल उद्याचा ज्ञानेश्वर होऊ शकेल’ – विश्वास पाटील.

 

‘मराठी हीच भाषा फक्त सक्तीची असेल. इतर भाषा सक्तीच्या नसतील…’ असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात दिले.

 

▪️ मुख्य मंडप, मंडप क्र.२, बालकुमार वाचक कट्टा, कविकट्टा, गझल कट्टा, प्रकाशन कट्टा… अशा विविध ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. बालकुमार वाचक कट्टा आणि गझल कट्टा बाजू बाजूला असल्याने आवाजाचा थोडा त्रास जाणवत होता. बाकीचे मंडप एकमेकांपासून दूर असल्याने हा प्रश्न आला नाही.

 

▪️संपूर्ण चारही दिवस संमेलनात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. त्यापैकी विशेष लक्षवेधी कार्यक्रम पुढील प्रमाणे –

– उद्घाटन सोहळा

– नाटक – शिकायला गेलो एक

– कथाकथन

– परिसंवाद – आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढ कथा यांचा दुष्काळ का आहे?

– परिचर्चा – अभिजात दर्जा नंतरची मराठी – संधी आणि आव्हाने.

– हास्यजत्रा

– गिरीश कुबेर यांची मुलाखत (मुलाखतकार – प्रसन्न जोशी, किशोर वेडकिहाळ)

– पुस्तकचर्चा – अमोल पालेकर, संध्या गोखले, वृंदा भार्गवे.

– निमंत्रितांचे कवीसंमेलन-१

– निमंत्रितांचे कवीसंमेलन-२

– परिसंवाद – आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती – विनय हर्डीकर, हेरंब कुलकर्णी….इ.

– कविकट्टा

– गझलकट्टा

– समारोप

– इतरही अनेक परिसंवाद, चर्चासत्रे संमेलनात होती.

 

▪️यावेळी प्रथमच नाट्यक्षेत्र आणि दूरदर्शन क्षेत्र यांना संमेलनात स्थान देण्यात आले‌ होते. प्रशांत दामले यांचे ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक आणि ‘हास्यजत्रा’ मधील‌ कलाकारांचे प्रवेश सादर झाले. हे दोन्ही कार्यक्रम एवढे हाऊसफुल्ल होते की मंडपात बसायला जागा कमी पडली, म्हणून लोक जमीनीवर, स्टॅंडमध्ये, बाहेरील स्क्रीन समोर बसून जिथे मिळेल तिथून कार्यक्रम पहात होते.

 

▪️कविकट्टा चार दिवस सतत सुरू होता. १७६३ कवितांमधून ४५० कवितांची निवड करण्यात आली होती.

 

▪️गेली काही वर्षे बंद पडलेल्या गझलकट्ट्याला यावेळी संमेलनात स्थान देण्यात आले होते. ५० निमंत्रित गझलकार आणि निवडलेले गझलकार यांची एकूण १८ सत्रे (म्हणजे जवळपास १८० गझल रचना सादर झाल्या). यावेळी गझल निवडीची अभिनव संकल्पना राबविल्याचे संयोजक विश्वास कुलकर्णी यांनी सांगितले. गझलकारांची नावे काढून फक्त गझल रचनाच निवडसमितीकडे देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक नवोदित गझलकार आणि गझल रचना यांना संधी मिळाली. माझी गझल निवडली जाईलच असं गृहित धरलेल्या अनेकांची निवड न झाल्याने चर्चा होताना दिसली. गझल निवड करण्याची हीच स्तुत्य पद्धत पुढील‌ संमेलनांमध्येही सुरू राहिली पाहिजे अशी चर्चा सर्वत्र होत होती. यावर्षीपासून गझलकट्टा दरवर्षी संमेलनात असणार आहे. शिवाय निमंत्रितांचे गझल सादरीकरण मुख्य मंडपातही ठेवण्यासाठी पुढील संमेलनात प्रयत्न करणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले.

 

▪️ संमेलनात श्री.समीर गुधाटे यांनी ‘मराठी मूड’ आणि ‘रंगमंच’ असे दोन स्तुत्य उपक्रम राबविले होते. यामध्ये अनेक मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. यामध्ये माझीही वृत्तबद्ध कवितेबद्दल मुलाखत या कार्यक्रमात शूट झाली आहे.

‘रंगमंच’ मध्ये अनेक कवींनी आपली रचना शूट करून घेतली. हे कार्यक्रम आपल्याला यूट्यूबवरती पहायला मिळतील.

 

▪️खानपान सेवा मुख्य संमेलन स्थळापासून थोडी दूर होती. पण खाद्यपदार्थांची रेलचेल होती. त्यामुळे इथेही खूप गर्दी दिसून आली.

 

▪️संमेलन स्थळापासून जवळपासची प्रेक्षणीय स्थळे (अजिंक्यतारा, सज्जनगड, शिवाजीराजे वस्तू संग्रहालय) इथे अनेकांनी भेटी दिल्या.

 

▪️उद्घाटन सोहळ्यात मंत्रीगण येणार म्हणून काळे कपडे न वापरण्याची सुचना पोलीसांकडून केली जात होती. ही विचारणा फक्त गेटवरतीच होत होती. आतमध्ये मात्र अगदी आयोजक, संयोजक, रसिक यातील बरेचजण काळे सदरे, जॉकेट घालून फिरत होते. त्यामुळे या हास्यास्पद नियमाची सर्वत्र चर्चा आणि खिल्ली उडताना दिसली.

 

▪️ कार्याध्यक्ष श्री.विनोद कुलकर्णी यांना कुणीतरी काळे फासण्याचा गैरप्रकार केल्याची बातमीही नंतर उशीराने आली.

 

▪️’अटकेपार’ ही संमेलन स्मरणिका येणार आहे असं समजलं. पण शेवटच्या दिवसापर्यंत स्मरणिका हाती आली नाही. मिळणार का? कधी मिळणार? प्रतिनिधींना विनामूल्य मिळणार की विकत देणार?… याबद्दल स्वागतकक्षात कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. शेवटी मी माझा पत्ता आणि नंबर तिथे देऊन आलो. परंतु अजूनही मला याबद्दल कुणीही संपर्क केलेला नाही… याबाबत सावळा गोधळ दिसून आला‌…

 

संमेलन म्हटलं की वाद-विवाद, मतभेद, कमी-अधिक, उणीवा… हे सारं आलंच. अनुभव, चुका, कमी… यातून धडे घेत पुढे जायचं. एवढं मोठं संमेलन पार पाडायचं यासाठी आर्थिक ताकद आणि मनुष्यबळ यांची मोठी तरतूद करावी लागते. आणि हे शिवधनुष्य महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहुपुरी आणि मावळा फौंडेशन, सातारा या आयोजकांनी यशस्वीपणे उचललं याबद्दल त्यांचे कौतुक.

 

मी प्रतिनिधी शुल्क भरले होते. माझी उत्तम हॉटेलमध्ये निवास व्यवस्था केली गेली होती. शिवाय तिथून संमेलन स्थळ चालत ५ मिनिटांवर होते.

साताऱ्यात शुद्ध गाढ्या दुधाचा चहा फक्त ₹१०/- मध्ये मिळत होता. मोदी कंदी पेढे याची चर्चा सर्वत्र होती…

एकंदरीत सातारा संमेलन सुफल संपूर्ण झाल्याची भावना घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो…

आता पायदान आणि प्लॅटफॉर्म मधील अंतर सांभाळत रोजचा नोकरीचा प्रवास परत सुरू….

 

पुढीलवर्षी १००वे‌ साहित्य संमेलन पुणे इथे ५ दिवसांचे असणार आहे? अशी चर्चा होताना दिसली…

▪️▪️▪️

आपला स्नेहांकित

विजो (विजय जोशी)

डोंबिवली @

9892752242

प्रतिक्रिया व्यक्त करा