विवेकानंद गृहनिर्माण संस्थेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार; विकासासाठी एकत्रित प्रयत्नांचे आश्वासन
सावंतवाडी :
“जन्मभूमी जरी वेंगुर्ला असली, तरी माझी खरी कर्मभूमी सावंतवाडी आहे. येथे अनेक वर्षे वास्तव्यास असल्याने या शहराशी माझे ऋणानुबंध घट्ट झाले आहेत. त्यामुळे वेंगुर्ल्याइतकेच प्रेम माझे सावंतवाडीवरही आहे,” असे प्रतिपादन वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांनी केले. सावंतवाडीतील प्रत्येक गल्लीचा अभ्यास असून, या भावनेतून विकास प्रक्रियेत सर्वांना सोबत घेऊन हे नाते अधिक दृढ करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी येथील विवेकानंद गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, तसेच नगरसेवक अजय गोंदावळे, नीलम नाईक, विना जाधव आणि ॲड. अनिल निरवडेकर यांचा शनिवारी संस्थेच्या प्रांगणात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा ममता मोहन जाधव होत्या.
प्रारंभी मोहन जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक मांडले. वेंगुर्ल्याचे नगराध्यक्ष असले तरी श्री. गिरप हे संस्थेचे सदस्य असल्याने संस्थेतील सदस्य नगराध्यक्षपदी विराजमान झाल्याचा आनंद व्यक्त करत, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा व दोन्ही वार्डांतील नगरसेवकांचाही संयुक्त सत्कार करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी श्री. गिरप यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या अध्यक्षा ममता जाधव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. नीलम नाईक यांचा सचिव श्री व सौ. मांजरेकर, अजय गोंदावळे यांचा चंद्रकांत चव्हाण, तर विलास जाधव यांचा नंदकिशोर कोंडये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना अजय गोंदावळे, नीलम नाईक व विलास जाधव यांनी कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात ममता जाधव यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत, स्वच्छ व पारदर्शक कारभाराबरोबरच शहराची सुंदरता टिकवण्याच्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच प्रवेशद्वाराजवळील दुर्गंधीच्या समस्येकडे लक्ष वेधून नगरपालिकेने त्यावर उपाययोजना कराव्यात, असे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता श्रीराम माळवदे यांनी आभारप्रदर्शनाने केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सौ. ममता जाधव यांनी सादर केलेल्या सुश्राव्य स्वागतगीताने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.
