You are currently viewing समुद्रावर मात करणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाला केंद्राची मोठी साथ

समुद्रावर मात करणाऱ्या विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाला केंद्राची मोठी साथ

दर्या बुरुजाच्या तटबंदीसाठी ८६ लक्ष रुपयांच्या निधीस एएसआयची मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा, खासदार नारायण राणे यांचा केंद्राशी पत्रव्यवहार

 

सिंधुदुर्ग / प्रतिनिधी :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि मराठा आरमाराचा कणा मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याला आता नवसंजीवनी मिळणार आहे. समुद्राच्या सततच्या लाटांमुळे व नैसर्गिक झिजेमुळे कमकुवत झालेल्या दर्या बुरुजाच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी केंद्र सरकारने भरीव निधी मंजूर केला आहे.

भारत सरकारच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) किल्ल्याच्या तटबंदीतील तुटलेल्या भागाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ८६ लक्ष रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या ऐतिहासिक रचनेचे शास्त्रीय पद्धतीने जतन व पुनर्संचयितीचे काम हाती घेतले जाणार आहे.

समुद्राच्या लाटांच्या माऱ्यामुळे तटबंदीखाली अंडरकट पोकळी निर्माण झाली होती, तर काही भाग धोकादायक अवस्थेत पोहोचला होता. ही बाब लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि टिकाऊ उपाययोजनांच्या माध्यमातून संवर्धनाचे काम केले जाणार आहे.

हे काम एमडब्ल्यू (संवर्धन) आरसीपी अंतर्गत मुंबई मंडळ व विजयदुर्ग उपमंडळामार्फत राबवले जाणार असून, या आरसीपीला पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक यदुबीर सिंग रावत यांनी मान्यता दिली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, खासदार नारायण राणे यांच्या केंद्र सरकारशी केलेल्या पत्रव्यवहारामुळे या निधी मंजुरीस गती मिळाल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे ऐतिहासिक वारसा जतन होणार असून, पर्यटनाच्या दृष्टीनेही सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठा लाभ होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा