समिधा नाईक यांची माहिती ; तालुका, जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतींना होणार पुरस्कारांचे वितरण…
ओरोस
राज्य शासनाच्या आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धेत २०१९-२० मध्ये कुडाळ तालुक्यातील पणदूर या ग्रामपंचायतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला आहे. या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.
दरम्यान २०१८-१९ मध्ये स्मार्ट ग्राममधील व २०१९-२० मध्ये सुंदर गाव स्पर्धेतील तालुका व जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण आज १६ फेब्रूवारी रोजी जिल्हा नियोजनच्या सभागृहात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली.
यावेळी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील उपस्थित होत्या. स्मार्ट ग्राममध्ये यासाठी तालुकास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना १० लाख रुपये तर जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. २०१८-१९ मध्ये तालुकास्तरावर कुडाळ तालुक्यात कसाल, मालवण तालुक्यात मालोंड, देवगड तालुक्यात पावणाई, वेंगुर्ले तालुक्यात मठ, दोडामार्ग तालुक्यात कुब्रल, कणकवली तालुक्यात असलदे, वैभववाडी तालुक्यात नावळे, सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली आणि इन्सुली या ग्रामपंचायती प्रथम आल्या आहेत. या ग्राम पंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये मिळणार आहेत. तर जिल्हास्तरावर कसाल व कुब्रल या दोन ग्रामपंचायतींनी विभागून प्रथम क्रमांक मिळविला आहे. या दोघांना विभागून प्रत्येकी २० लाख रुपये बक्षीस मिळणार आहे, असे यावेळी सौ. नाईक यानी सांगितले.
राज्याच्या ग्रामीण भागात स्वच्छ्ता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच प्रमुख मुद्द्यावर एका वित्तीय वर्षात सर्वोत्तम काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करून त्यांना २०१८-१९ पर्यंत स्मार्ट ग्राम हा पुरस्कार तालूका व जिल्हास्तरावर देण्यात येत होता. यामध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक काढला जातो. त्यानंतर या तालुका प्रथम मधून पुन्हा जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक निवडला जातो. तालुक्यात प्रथम क्रमांक आल्यास १० लाख रुपये, तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक आलेल्या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये बक्षीस दिले जाते. यातील २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षातील निकाल यापुर्वीच जाहिर करण्यात आले होते. तर आता २०१८-१९ चा निकाल जाहिर करण्यात आला आहे. आर. आर. पाटील सुंदर गाव स्पर्धा २०१९-२० या दोन वर्षातील निकाल जाहिर करण्यात आले आहेत. तसेच बक्षीस वितरण आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी दिनी १६ फेब्रुवारीला करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, असेही यावेळी सौ. नाईक म्हणाल्या.
यातील वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारत शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, आरोग्य व शिक्षण सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, बचतगट, प्लास्टिक वापर बंदी, करपट्टी वसूली, मागासवर्गीय-महिला व बालकल्याण-अपंग खर्च, लेखापरीक्षण, ग्रामसभा, सामाजिक दायित्व, एलईडी दिवे वापर, सौरपथदिवे, बायोगॅस वापर, वृक्ष लागवड, जलसंधारण, अभिलेखा संगणकीकरण, सुधारित तंत्रज्ञान वापर, संगणक, आधारकार्ड आदी मुद्द्यावर परीक्षण केले जाते. त्यानुसार केलेल्या मूल्यमापनात २०१८-१९ व २०१९-२० या वित्तीय वर्षात या ग्रामपंचायतींनी यश संपादन केले आहे.
२०१९-२० मध्ये तालुकास्तरावर कुडाळ तालुक्यात पणदूर, मालवण तालुक्यात हडी, देवगड तालुक्यात कुणकेश्वर, वेंगुर्ले तालुक्यात कुशेवाडा, दोडामार्ग तालुक्यात तळकट आणि केर भेक़ुर्ली, कणकवली तालुक्यात ओटव, वैभववाडी तालुक्यात करुळ, सावंतवाडी तालुक्यात कुडतरकर टेंब यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. जिल्हास्तरावर पणदूर ग्राम पंचायत प्रथम आली आहे. आज १६ रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वितरण होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यात ऑनलाइन सहभागी होणार असल्याचे यावेळी सौ. पाटील यांनी सांगितले.