*लेखक, कवी, पत्रकार ॲड रुपेश पवार लिखित लेख*
*राजकारणातील दशा आणि दिशा*
मुंबई ठाण्यातील महानगरपालिकांचे बिगुल वाजले आहे. 15 जानेवारी 2026 रोजी या निवडणुका जवळजवळ सात आठ वर्षांनी होणार आहेत. अशावेळी शिवसेना या पक्षाची दोन शकले झाली आहेत. नाही म्हटले तरी दोन्ही शिवसेना थोड्याफार कमजोर झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेत आहे. त्यामुळे त्यांची शक्ती वाढलेली आहे. त्या पक्षाकडे पुरेसा पैसा आहे. तरी देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना बहुमताच्या दृष्टीने कमजोर वाटते.
त्याचवेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईत जास्त आहे पण त्यांच्याकडे कोणतीही सत्ता नाही.
विरोधी पक्ष म्हणून ठाकरे यांची शिवसेना खूप मोठे काम करत आहे परंतु ती त्यांची विरोधी बाजू पण कमजोर पडत आहे. याचे कारण भाजपा या पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढले आहे. आज उद्धव ठाकरे म्हणत असले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ब्रेक केली आहे. तरीदेखील उद्धव ठाकरे यांच्या पराभवामागे एकनाथ शिंदे नाहीत तर संपूर्ण भाजपा आहे. भाजपाने आपल्या विचारातून महाराष्ट्राची जय, वीरू ही जोडी फोडली. म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन मित्रांना फोडले. अशावेळी उद्धव ठाकरे यांनी 2022 ला विधानसभा निवडणुका होण्या आधी जर आपले बंधुप्रेम सिद्ध केले असते. म्हणजे ते राज ठाकरे यांना मिळाले असते तर कदाचित विधानसभेत उद्धव ठाकरे गट बहुसंख्येने विधानसभेच्या विरोधी पक्ष बाकांवर बसला असता. महाविकास आघाडीचा कदाचित बोलबाला झाला असता पण तसे राज, उद्धव यांनी केले नाही. ही चूक त्यांनी आता सुधरवली आहे. त्याचा काही उपयोग होणार आहे का? हे येत्या निवडणुकीत आपल्याला कळणार आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे युतीमुळे मुंबईचे आणि ठाणे जिल्ह्याचे भले होणार आहे का? हा पण यातला खूप मोठा प्रश्न आहे. कारण दोन बंधूंनी राजकारणात एकत्र यावे हे तत्वाला धरून आहे
परंतु हे राजकारणात किती उपयुक्त आहे. ते लोकांच्या मनावर ठरते. आज भाजपा व एकनाथ शिंदे शिवसेना गट यांच्याकडे सत्ता, पैसा, धोरण हे सर्व आहे. त्या तुलनेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळ देण्यासारखे काही नाही. फक्त एकमेव आश्वासन आहे, की आम्ही येऊ तेव्हा लोकांचे भले करू आणि अर्धवट कामे, धोरणे पूर्ण करून, भ्रष्टाचार घालून टाकू व भ्रष्टाचार करणाऱ्यांना तुरुंगाची हवा देऊ पण तसे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करतील असे वाटत नाही, तसे केले तर चांगले आहे. आज मुंबई, ठाणे जिल्ह्यातील काही भागात परप्रांतीयांची अरेरावी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हे एका वर्षात आपण खूप वेळा पाहिले आहे. त्यामुळे मराठीचा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे, राज ठाकरे आले आहेत, ती एक सकारात्मक बाजू आहे.
पण मुंबई, ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या मनात हा ही एक प्रश्न डोकावत आहे. बाळासाहेब ठाकरे असताना 1970 – 80 या काळातील मराठी तरुण, तरुणींना बाळासाहेबांनी नोकऱ्या दिल्या, उद्योग उघडून दिले परंतु त्यानंतर त्यांनी फक्त मराठीचा स्वाभिमान जागवला. पुढे मराठी माणसाकरता विकासात्मक कामे बाळासाहेब ठाकरे यांनी केलेली दिसत नाहीत. मुंबई, ठाणे शहरात त्यावेळी शिवसेनेचा बोलबाला होता परंतु या शिवसेनेने आरेला कारे करण्याचे लोकांना शिकवले, तोच एक फायदा मराठी माणसाचा झाला परंतु बिल्डर उद्योग, अवजड उद्योग, सेवा उद्योग, बँक, पतपेढ्या व इतर उद्योगांच्या याबाबतीत शिवसेनेने मराठी माणसाला वर आणले नाही. वडापावाच्या गाड्या, पोळी भाजी केंद्र हे काढून मराठी माणसांना स्वयंपूर्ण करता येत नाही. त्याकरता उद्योग धंदे मराठी लोकांच्या हातात असावे लागतात परंतु बाळासाहेबांच्या शिरेदारांनी त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली नाही. कारण गरिबीतून वर आलेल्या शिलेदारांंनी शेवटी तलावाचा विचार केला त्या शिलेदारांंनी समुद्राकडे बघितले नाही. म्हणून आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नशिबात मोठा संघर्ष आला आहे. कारण त्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे राजकारण पुढे सुरू ठेवले आहे परंतु बाळासाहेब ठाकरे यांना ग्राउंड रियालिटी समजली त्यावेळी ते गप्प बसले नाहीत. त्यानी महाराष्ट्राचा विकास करून दाखवला. म्हणून आज आपण पश्चिम महाराष्ट्रात कमी वेळात प्रवास करू शकतो. त्यावेळीची मुंबई त्यांनी रस्त्यांची, फुलांची करून दाखवली. त्या काळात शरद पवार म्हणत होते, राज्याच्या तिजोरीत पैसा नाही तरी देखील सत्तेच्या जोरावर बाळासाहेब ठाकरे यांनी विकास केला परंतु सामाजिक, शैक्षणिक, उद्योजक बाजूने ही शिवसेना अपयशी ठरली. तेच पाडे हे दोन बंधू गात आहेत.
अशावेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या छोट्या भाजपाने उत्तुंग अशी प्रगती साधली. दोन आमदारांवर असलेला पक्ष, अठरापगड पक्षांना एकत्र घेऊन एनडीए आघाडी करून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सत्ता मिळू शकतात. ती सत्ता शरद पवार यांच्या यूपीएने तोडल्यावर देखील दहा वर्ष भाजपा हा पक्ष संघर्ष करतो. विरोधी बाकांवर आपले रक्त, घाम गाळून जनतेचे प्रश्न मांडतो, असंतोष निर्माण करतो मग 2014 या वर्षात, एक ऋषीमुनी मोदींच्या रूपात येतो. पुढील अकरा वर्ष देशाची आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळतो, सर्व राष्ट्राचा विकास करतो. हे सर्व राज, उद्धव यांनी मुंबई, ठाण्यात करायला हवे होते. मग महाराष्ट्राने त्यांना सचिन तेंडुलकरप्रमाणे खांद्यावर उचलले असते, जे झाले ते झाले परंतु आज मात्र हे दोन बंधू एकत्र आले आहेत. तत्त्वनिष्ठता या दोन पक्षांकडे आहे. तत्त्वनिष्ठता काँग्रेसने, राष्ट्रवादीने, भाजपाने रसाताळ्याला नेली आहे असे म्हटले जाते. एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट थोड्याफार प्रमाणात या पक्षांसारखा आहे पण त्यांच्यात मात्र थोडीबहुत जनते विषयी तत्त्वनिष्ठता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या चुका सुधारून, पुन्हा मुसंडी मारून काहीतरी वेगळे राजकारण खेळले पाहिजे. कारण एक मोठा सत्ताधारी पक्ष आपल्या युतीतील छोट्या सत्ताधारी मित्राला शह देऊ शकतो. हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने समजून घेतले पाहिजे. निदान हे करताना मराठीचा मुद्दा हा महत्त्वाचा केला पाहिजे. अवघड उद्योग, बिल्डर उद्योग, सेवा उद्योग, बँक, पतपेढ्या इतर उद्योग. हे सर्व मराठी माणसांकरता करावे त्यांना या उद्योग, धंद्यांची प्रेरणा द्यावी. नुसते बचत गट करून काही होणार नाही. हे धोरण पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठेवावे, प्रचार आता त्या गोष्टींचा करावा, विकासाची कामे आता होतच राहतील पण मराठी माणूस आपल्या कामाकार्यासकट मुंबई, ठाण्यात राहिला पाहिजे. हे सर्व मराठी विचारांच्या पक्षांनी लक्षात ठेवले पाहिजे.
भाजपा पक्षाने या निवडणुकीत एवढेच लक्षात ठेवावे. भाजपा हा पक्ष महाराष्ट्रात नागपूरमध्ये जन्माला आलेला आहे. मराठी माणसांनी या पक्षाचे सुरुवातीला नेतृत्व केले आहे. भाजपाने मराठी माणसाचा मुंबईत विचार केला पाहिजे. परप्रांतीयांचा नाही. त्याचप्रमाणे मुंबई केंद्रशासीत करण्याचे कारस्थान असेल तर ते बाजूला ठेवावे.
कारण मराठी माणसाची सत्ता असो नसो तरीही मराठी माणूस हे कदापी होऊ देणार नाही. पक्ष, राजकारण बाजूला ठेवून मराठी माणसाला लढाई करता येते. मानहानीचे पानिपतचे युद्ध हरल्यानंतर महादजी शिंदे यांनी धडाका लावून सव्वाशे वर्ष मराठी सत्ता दिल्लीत गाजवली. तेच काम आता एकनाथ शिंदे यांनी मुंबई, ठाण्यात करायचे आहे. आता कसे राजकारण होईल हे मतदार राजा ठरवेल. मराठी माणसा जागा हो आणि विचारपूर्वक मतदान कर एवढेच सांगणे आपल्या हातात आहे.
ॲड.रुपेश पवार, ठाणे
9930852165
