राजवाड्यात शुभेच्छांची देवाणघेवाण, शहरविकासासाठी पक्षभेद विसरण्याची ग्वाही
सावंतवाडी :
निवडणुका संपल्यानंतरही माणुसकी, सलोखा आणि परस्पर सन्मान जपण्याची सावंतवाडीची ओळख पुन्हा एकदा अधोरेखित झाली. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी भाजपाच्या नवनिर्वाचित सावंतवाडी नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोसले यांची राजवाड्यात भेट घेऊन पुष्पगुच्छ देत भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीत राजकीय मतभेद बाजूला ठेवून सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहराच्या हितासाठी पक्षभेद न करता एकत्र काम करण्याची परंपरा कायम राहील, असा सकारात्मक आणि विश्वासार्ह संदेश या सौहार्दपूर्ण संवादातून देण्यात आला.
या वेळी युवराज लखमराजे सावंत-भोसले उपस्थित होते. या भेटीमुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात समन्वय, सलोखा आणि परस्पर आदर यांचा आदर्श पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.
