*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम लेख*
*माणूसपण जपणारा, सच्चा अभिनेता, पर्यावरण प्रेमी:- सयाजी शिंदे*
ताई मी व्हीडिओ कॉल करतो.; सयाजी शिंदेशी बोला, हे त्यांचा समन्वयक अमोल जाधव चे शब्द ऐकले आणि मी खूप चकित झाले . विविध भाषेतल्या अनेक चित्रपटात नकारात्मक भूमिका करणारी ही व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल ?कसे बोलेल? ही धाकधूक मनात ठेवून मी कॉल घेतला. ज्यांच्याबद्दल प्रचंड कुतुहुल होते ,नुकतीच ज्यांची वृक्षप्रेमी म्हणून ओळख होत होती त्यांचे प्रत्यक्ष दर्शन ही अमोल दुर्लभ पर्वणी ! अमोल जाधवमुळे मिळाली होती. नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात त्यांचा प्रखर विरोध आहे.गोदावरी नदीच्या काठावरील हे ऐतिहासिक धार्मिक पवित्र ठिकाण! तपोवन म्हणजे तपस्येचे ठिकाण! रम्य हिरवाईने सजलेले ह्या क्षेत्रातील जवळपास १८०० मोठी झाडे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळाव्याला येणाऱ्या साधूसंतांच्या निवासव्यवस्थे
साठी कापल्या जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयाविरुद्ध ते खंबीरपणे काम करीत आहेत.
एकीकडे पडद्यावर चा खलनायक आणि एकीकडे वृक्ष हेच आपले मायबाप ही संकल्पना राबविणारा सच्चा पर्यावरण प्रेमी! आम्हा विदर्भवासियांना त्यांचा परिचय झाला पाहिजे म्हणून हा लेखनप्रपंच!
समाजासाठी काम करणारी बहुतांश मंडळी सामान्य कुटूंबातूनच आलेली असतात असे माझे निरीक्षण ! त्यांनाच जीवनातील अडीअडचणीची जाणीव असते. सयाजी सुद्धा ह्याला अपवाद नाहीत. सातारा जिल्ह्यातील वेल कामठी या लहानशा गावात एका शेतकरी कुटूंबात त्यांचा जन्म झाला. आईवडील अतिशय साधे! स्वाभिमान जपणारे! कुणाकडून मदतीची अपेक्षा करू नये , फुकटचं कधी घेऊ नये ह्या विचाराचे वडील ,तर शिक्षणाचे महत्व जाणणारी आई! आपल्या मुलाला खूप शिकायला मिळावे म्हणून तिच्या मनाची तडफड तीच जाणे! सयाजींना नाटक अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती कॉलेजमध्ये असतांना त्यांनी नाटकात कामही केले. परंतु आर्थिक स्थितीची जाणीव असलेल्या सयाजीनी पदवी परीक्षे आधीच कुटूंबाला आर्थिक हातभार मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सिंचन विभागात नोकरी करायला सुरुवात केली त्याचवेळी नाटकातही काम करणे सुरू झाले होते झुलवा नाटकातील त्यांच्या अभिनयाने त्यांना उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळख मिळवून दिली. मनोज वाजपेयींनीमुळे त्यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. पुढे हे साताऱ्याचे झाड दक्षिणेत गेलं ,व खलनायक म्हणून त्यांची बुलेट ट्रेन हिंदी तमिळ तेलगू कन्नड मल्याळम गुजराथी भोजपुरी अशा भाषेतले चित्रपट करीत तुफान वेगाने निघाली १९९५ मधील अबोली ह्या मराठी चित्रपटाने त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट ऐक्टर हा पुरस्कार मिळवून दिला! त्यांचे गाजलेले काही चित्रपट म्हणजे शूल, नटरंग, वास्तव जोगवा, भुलभुलैय्या हे आहेत. त्यांच्या मते कामांची लांबी वाढविण्यापेक्षा गुणवत्तेची उंची वाढलीपाहिजे
दक्षिणी चित्रपटसृष्टीत त्यांची विशेष प्रतिमा निर्माण झालेली आहे. विविध भाषेत अनेक प्रकारच्या भूमिका सहज करणारा ह्या गुणी कलाकाराला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळाली आहे लहापणापासून साधी सरळ राहणी व वागण्यात खरेपणा ह्याचे बाळकडू आईवडीलाकडून मिळाले होते. स्थानिक स्तरावर नाटकात काम करणारे आज आपल्या मेहनतीने प्रामाणिकपणाने प्रसिद्धीच्या शिखरावर कसे पोहचले ह्यावर एक भली मोठी कादंबरी व्हावी इतका त्यांच्या कामाचा विशाल विस्तार आहे! आईवडीलावर नितांत प्रेम असणाऱ्या ह्या लेकराचे मातृप्रेम पाहिले की कौतुक वाटते आईचा सहवास कायम तर मिळणार नाही पण तिच्या वजनाइतक्या बिया लावून झाडे वाढविण्याचा त्यांचा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे संपूर्ण महाराष्ट्राला हिरवेगार करण्याच्या त्यांच्या संकल्पाला त्यांच्या जिवलग मित्रांची साथ आहे अरविंद जगताप, रघुनाथ ढोले, असे त्यांचे अनेक मित्र त्यांना या कामात जीव ओतून मदत करतात त्यांचे म्हणणे असे की उन्हात चालले की झाडांची, सावली कळते, प्रत्येकाने निदान पाच झाडे लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत असे त्यांचे आग्रही सांगणे असते. सयाजीनी उत्कृष्ट कलाकार म्हणून अनेकपुरस्कारमिळवलेआहेत , ह्या त्यांच्या परीचयापेक्षाही
ते माणुसकी जपणारे जमिनीवर राहणारे , झाडावर पर्यावरणावर प्रेम करणारे आहेत ही त्यांची सर्वोत्तम ओळख आहे ह्याला कारणही तसेच आहे पाण्याचे दुर्भिक्ष असतांना दूरवरून घरच्या साठी पाणी आणतांना एक तपेले पाणी दारातल्या वृद्ध जांभळाच्या झाडांसाठी पाणी आणणाऱ्या वडिलांचे व चार करोडचा बंगला पाहून हुरळून न जाता कशाला एव्हडे घर? बाजूला असलेल्या रिकाम्या जागेत का नाही बांधले रे घर म्हणणाऱ्या आदर्श आईचे ते सुपुत्र आहेत दोन वेळची भाकरी मिळाली की खुश असे समाधानी सयाजी शिंदे ! साधं राहावं, मातीशी इमान राखावं , तुम्ही मोठे आम्ही लहान ही वृत्ती असणारे सयाजी! त्यांच्याविषयी कितीही लिहिले तरी कमीच पडावे असे त्यांचे जीवन!
बँकेत नोकरी करतांना वरिष्ठांची हाजी हाजी न करणारे ! शेवटी त्याच बँकेत त्यांची बँक अंब्यासेंडर म्हणून नियुक्ती झाली सह्याद्रीदेवराईवाचविण्यासाठी
त्यांचे काम जोरात सुरू आहे
झाडावर प्रेम करणाऱ्या ह्या वृक्षप्रेमीचे महाराष्ट्रात १०० देवराई निर्माण करण्याचे स्वप्नां आहे . देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले गायरान ! तिथे अनेक लहानमोठी झाडे असावीत. गुराढोरांना चारा सावली मिळावी, पशुधनातही वाढ व्हावी असे त्यांचे स्वप्न। परंतु जिथे राम आहे तिथे रावण असणारच ! त्यांनी जीवाचे रक्ताचे पाणी करून लावलेल्या बीड मधल्या एका देवराईला मोठ्या प्रमाणात आग लागली आहे स्वतः सयाजी आग विझवत होते हे दृश्य तुम्हीही पाहिले असणार! मान तालुक्यात इतका दुष्काळ का हे शोधण्यासाठी फिरतांना त्यांच्या लक्षात आले की तेथे सावलीला बसायला जागा नाही सावली देणारी झाडेच नाहीत झाडे पाणी धरून ठेवतात म्हणून मित्रांच्या सहकार्याने त्यांनी तेथे पुन्हा झाडे लावली असा हा कलंदर मनाचा खरा हिरो!
गावावर झाड झुडपावर गायी वासरावर , प्रेम करणारा खाली बसून आनंदाने भाजीभाकरी खाणारा!
त्याला साथ त्याच्या सहचरिणीची सौ अलकाची !
चिंता वाहतो विश्वाची अशी वृत्ती असणाऱ्या ह्या कलंदर नायकाची पत्नीही तशीच आहे! जरी सयाजी जाहीर कबूल करीत नसतील तरी मनात मात्र तेरा साथ है तो मुझे क्या कमी है ! पत्नीबद्दल हीच भावना असणार त्यांच्या मनात! सयाजी शिंदेचा पिंड स्वस्थ बसणाऱ्यांचा नाही ! प्रसिद्धी, कीर्ती मिळाली आता आराम करू असे त्यांना बिलकुल वाटत नाही झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम धडाक्यात सुरू असतांना, निसर्गावर झाडाझुडपावरच्या प्रेमाने झपाटलेल्या सयाजीचे अभिनयावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही साधारण ५३ वर्षा पूर्वीचे विजय तेंडुलकरांचे सखाराम बाईंडर हे नाटक ! निळू फुलेंचा सखाराम व लालन सारंग ने साकारलेली चंपा ! या दोघांनी हे नाटक आपल्या अभिनयाने उंचीवर नेलं अश्लीलतेचे कारण दाखवीत हे नाटक बंद पडण्याचेही प्रयत्न झाले होते परंतुआदरणीय बाळासाहेब ठाकरेंना हे नाटक दाखविल्या गेले त्यांची नाटकाला पसंती मिळाली असा ह्या नाटकाचा थोडक्यात इतिहास ! हेच नाटक आता पुन्हा अनेक शहरात मोठ्या धडाक्यात सुरू आहे सखाराम च्या भूमिकेत सयाजीनी आपले सारे कसब लावले आहे ! वासनेने पेटलेला सखाराम व शेवटच्या प्रसंगात अवसान गळालेला सखाराम दोन्ही प्रसंग त्यांच्या अभिनयाची कमाल दाखवितात
मै जिंदगीका साथ निभाता चला गया, हर फ़िक्र को धुएमे उडाता चला गया
जो मिल गया उसिको मुक्कदर समझ लिया जो खो गया उसको भुलाता चला गया अशी त्यांची वृत्ती!
सयाजीबद्दल एका वाक्यात सांगायचे तर–
तुमसा नही देखा असंच म्हणावसं वाटतं मला!
अशा ह्या ध्येयवेड्या सयाजी शिंदेंबद्दल लिहू तितके थोडे अशी माझी स्वतःची अवस्था!
तेंव्हा इथेच थांबते !
——-
झाडे लावा झाडे जगवा ह्या मोहिमेत भाग घेण्याची इच्छा असणाऱ्या पर्यावरण प्रेमी मित्रासाठी संपर्क मो न आहे 👇 ९८२३१९९५९८
प्रतिभा पिटके
अमरावती
९४२१८२८४१३
