*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”पोयतं”….*
लग्नातच चार तांबे भोवती सुत गुंडाळतात
आणि त्याचं “ पोयतं” करून वधूच्या गळ्यात
बांधतात..
सुत म्हणता म्हणता त्याची दोरी होते कळत नाही
सुरूवातीपासूनच सासू तिला रोज रोज आवळत
जाई…
एकदा आली आवाक्यात की नवराही मग आवळतो
माय लेकरांना तो खेळ फार फार आवडतो
उड्या मारते दोरीवरच्या इकडून तिकडे पळते ती
पुरता फास “ पोयत्याचा” जाऊन जाईल कुठे ती?
भला मोठा हुंडा देऊन कर्ज उरावर घेऊन पाठवणी असते केलेली
तोंड दाखवू नकोस आता चालणार नाही परतून
आलेली
घुसमट घुसमट देखावा तो वरवर दिसतो सौख्याचा
विचार करून भुगा होतो बिचाऱ्या नव्या नवरीचा..
सरावच करून घेते वाटा असतात साऱ्याच बंद
पाश आवळत समाजाचे अदृश्य ते निर्बंध
पोरे सोरे वाढता व्याप पिचून जाते त्यात पुरी
मुलगी आहे सासरी सुखात समजूत करून घेतात
बरी..
तोंड बंद मन बंद पुरती मशिन बनते ती
अशीच जाते आयु निघून आतबाहेर जळते ती
जळणे तिचे दिसत नाही वाटते बंद मूठ लाखाची
मूठ उघडताच अब्रू चव्हाट्यावर बापाची…
शेवटी मग करकचून वळतात सारे गठळी तिची
सरणावरती जळतांना ढील मिळते दोरीची
सैल होतात सारे बंध मुक्त होते सर्वार्थाने
“ फार चांगली होती हो” सासरचे सांगतात गर्वाने…
कठपुतळीच्या दोऱ्या कधी समाजास दिसत नाहीत
विचारून पहा आपल्या मनास सारे काही आहे
माहित…
प्रा. सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
