You are currently viewing येतोय शिशिर
Oplus_16908288

येतोय शिशिर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*

 

*’येतोय शिशिर‘*

 

सकाळीच लवकर ऊठून ,स्वत:चे आटपुन फिरायला लवकरात लवकर बाहेर पडायची मला खुप घाई असते. ती माझी जुनीच संवय आहे.

मी कायमची निसर्गाच्या प्रेमात पडलेली आहे. मला ऋतू कोणताही असो… वेळ. हवा हवामान काही असो … मला निसर्ग सुंदरच दिसतो. त्यातले बदल लगेचच जाणवतात.

सध्या परतीचा पाऊस थोडा लांबला पण आता माघारी वळलाय. आकाश निरभ्र, निळसर , शांत असं निरखत जायला खुप मजा येते. अवनीची अजुन हिरवाई, तजेला टिकून आहे.

वातावरण थोडं ऊकडतंय, थोडं गार वाटतंय अशा सीमेवर आहे.

पक्षांची पिल्ले हळूहळू घरटी सोडून ऊडालेली आहेत. मामबाप रिकाम्या घरट्याची काळजी घेत बसलेत.

शेतातली डुलणारी पिके कापणी, झोडणी होत कडबा गुरांना पोचलाय. पिक जागच्याजागी पोंचल्याने बळीराजा खुष आहे.गाई गुरं मस्त मजेत आहेत. एकंदर हेमंती वातावरण पक्क मुरलंय निसर्गात.

सात आठ दिवसात थोडा फरक जाणवूं लागतो. हवा कोरडी शुष्क , थोडी गारव्याची जाणिव असणारी कळूं लागते. वारे वाहू लागतात. झाडेझुडपे शुष्क वाटायला लागतात. हिरवाई तजेला नाहीसा होऊ लागतो.

काही वृक्षांची पाने गळायला लागतात, तर काहींची लाल गुलाबी होऊ लागतात . प्राजक्त, जाई जुई, मोगरा अनंत इ. आपले बहर आटोपते घेऊ लागतात. तगरीची पाने सगळी पडत फक्त फुले. मात्र ऊमलत रहातात. फुलं, सुगंध, अनेक रंगांची ती रंगपंचमी व सुवासिक गंध पळच काढतात. झाडे .. ना फळे … ना फुले.. ना पाने .‌ अशी निस्तेज, निष्पर्ण होऊ लागतात. सकाळी आळसावलेली ऊषा आपले रंग कमी करते. प्रकाश ही ऊशीरा येतो. अंधार बराचवेळ टिकतो. तर संध्याकाळी संध्या मात्र अबोली पिवळी रंगत थकलेल्या रवीबिंबाला घेऊन लवकरच पश्चिमेला आधी सागराला आणि नंतर पश्चिमेला रंगवत खाली ऊतरते .अशावेळी तो अबोली, पिवळा रंगात रंगलेला सागर त्याचा किनार्याकडे धावणार्या लाटा व हळूहळू डोंगरामागे जाणारी रवी व संध्येची जोडी. हे द्रृष्य खरंच डोळ्याचे पारणे फेडतात.

मग पसरतो सहा वाजताच अंधार.

नभांगणी एकेक नक्षत्रांचे दिवे लागू लागतात तारकादले आपापला खेळ मांडू लागतात.

रात्री गारवा अंगात शिरशिरी भरू लागतो. पक्षी आपले कंठ गोठल्यासारखे लवकरच शांत होतात. पांखरांच्या किल किल करणार्या शाळांना सुट्टी लागते.

लवकरच गावे ही काळोखात गुडूप होतात.

वार्याबरोबर सूखलेली पाने झाडांभोवती गिरक्या घेत खाली तरू तळी साठायला लागतात.

वातावरण असं निशब्द, स्थिर स्तब्ध झालं मनातही थोडी ऊदासी, निरूत्साह, निराशेची कोळीष्टके जमायला लागतात.

आता सकाळी जाणवणार्या थंडीत फिरायची गंमत फारच मोहात पाडणारी असते.

झुंजूमुंजू पहाट झालेली… तसा चांगलाच गारवा… शांत स्तब्ध तरू वेलींवर कुठूनसे छोटे छोटे दंवबिंदू छान ओघळत येतात. पानाफुलामागे दडतात. … कानगोष्टी करतात.

असलेली पाने ,ऊरलेली सुकलेली फूलं यांच्याबरोबर ही दंवबिंदुंची बाळे रूपेरी रंगात छान चमकतात. मोहुन टाकणारा त्यांचा खेळ बघत रहावंस वाटतं.

सकाळी ऊशीरा रवी किरणे आल्यावर मातीत ऊड्या मारत विरघळून जातात.

आता शिशिराचे वारे वाहुन हुडहुडीच भरायला लागते,… आणि मजेत थंडीची चाहुल घेत कधी शिशिराचा खरा गारठा अंगाला गोठवायला लागतो समजतही नाही. अंग आंखडून जाते. गोधडी सोडू नाहीसे वाटते.

घरात चुल पेटल्यावर जरा ऊब येते. मग आल्याचा मस्त चहा जरा ऊत्साह आणतो व शिशिराचा दिवस आळसात सुरू होतो.

पण थंडीची चाहुल देणारा शरद ऋतू व त्याचे रंग, रूप व रूबाब फारच देखणा असतो.

अर्थात हे जाणवायला तुमची नजरही दर्दी असावी लागते.

पण निसर्गाला आपला सोयरा मानला कि, तो आपलाच होऊन जातो नाही का?

 

अनुराधा जोशी.

विजयनगर सहवास.

अंधेरी पूर्व ६९

मुंब ई.

9820023605

प्रतिक्रिया व्यक्त करा