कुडाळ नगरपंचायत विषय समिती सभापतींची ३० डिसेंबरला निवड…
कुडाळ
येथील नगरपंचायतीच्या विविध विषय समिती सभापती पदांसाठी आणि महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी मंगळवार, ३० डिसेंबरला निवडणूक होणार आहे. यासाठी सकाळी ११ वाजता नगरपंचायतीच्या कार्यालयात विशेष सभा बोलावण्यात आली असून, याच दिवशी स्थायी समितीची देखील स्थापना केली जाणार आहे.
विषय समिती सभापतींची मुदत १० डिसेंबर रोजी संपल्यामुळे ही नवीन निवड प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक उमेदवारांना दुपारी १२ ते १:२० वाजेपर्यंत आपले उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) सादर करता येतील. त्यानंतर दुपारी २ वाजता विशेष सभेमध्ये प्रत्यक्ष निवड प्रक्रिया पार पडेल.
कुडाळ नगरपंचायतीमधील सध्याचे राजकीय पक्षीय बलाबल पाहता, या निवडी बिनविरोध होणार की सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरस पाहायला मिळणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवडीनंतर नगरपंचायतीच्या कामकाजाला नवी गती मिळण्याची शक्यता आहे.
