You are currently viewing गावाकडच्या वल्ली

गावाकडच्या वल्ली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी चंद्रशेखर धर्माधिकारी लिखित गावाकडच्या वल्ली कथासंग्रहाचं वेदश्री देशपांडे यांनी केलेलं समीक्षण*

 

शहरात माणसं राहतात पण गावात वल्ली राहतात हे वाक्य वाचकांच्या मनावर खोलवर कोरली जाणारी साहित्यकृती म्हणजे *लेखक चंद्रशेखर धर्माधिकारी* लिखित गावाकडच्या वल्ली हा लघुकथा संग्रह. गावाकडच्या वल्ली या संग्रहात नायक नायिका खलनायक खलनायिका रंगवल्या नाहीत तर गावाच्या रंगमंचावर आपल्याच गावातल्या आपल्याच ओळखीच्या विविध भूमिका साकारणारे नटसम्राट आहेत. माणसांच्या विविध स्वभावांचा जीवनदृष्टीचा माणुसकीचा जिवंतपट आहे. या पुस्तकातली प्रत्येक वल्ली वेगळी असली तरी सर्वांमध्ये जीवनावर प्रेम करण्याची एक समान धडपड दिसते. ग्रामीण जीवनाचे हृदयस्पर्शी चित्र रेखाटलेले आकर्षक मुखपृष्ठ वाचकाला गावाकडच्या जगात घेऊन जाण्याची ताकद दर्शवतो.

*गुलाबराव मास्तर* हे आदर्श शिक्षक… कृतज्ञता व्यक्त करणारा त्यांचा विद्यार्थी… पुढे झालेली त्यांची ताटातूट… या भावनिक प्रसंगातून नात्यांची खोली स्पष्ट होते. पुढे चालून आलेल्या योगायोगानं शिक्षक विद्यार्थ्यांचे जावई होतात तेव्हा कथेला वेगळं मिळतं

*सांगकाम्या गणूचा* साधेपणा, निरागसता त्याच्या या वृत्तीतून पाटलाची मुकी मुलगी बोलकी होते. या चमत्कारातून कथा आशय पूर्ण होत जाते.

*भाजीवाली काशीबाई* भाजी कमी आणि गप्पा जास्त तोलते. शिकली- सवरली नसून अत्यंत साधी, प्रामाणिक, स्वाभिमानी स्त्री म्हणून समोर येते. चोरीचा आळ असताना तिच्या चारित्र्याची सहनशीलतेची कसोटी लागते. आपल्या कृतीतून उत्तर देते. समाजहितासाठी स्वतःचा पैसा उपयोगात आणताना तिच्या विचाराची प्रगल्भता दिसून येते.

आनंदी जीवन जगण्याची कला शिकवणारा *रामलाल* सकारात्मकतेचा मंत्र देऊन जातो. परमेश्वराने चेहऱ्यावर केलेली स्वाक्षरी त्याला अश्रूंनी धुवून टाकू नका… क्रोधानी भिजवून मिटवू नका… या वाक्याने कथेचा शृंगार वाढतो.

*गाव सुधारक रावसाहेब* समाजसेवा करताना केवळ वरवरची प्रशंसा महत्वाची नसून लोकांच्या मनातील खरी समाधान ओळखतात. लोकाभिमुख दृष्टी ठेवून आत्मपरीक्षणाला महत्त्व देतात.

वस्तरा चालवताना आयुष्याचं तत्त्वज्ञान सांगणारा *नत्थु न्हावी*… गावाच्या विकासासाठी कीर्ती रूपे मागे उरतो.

*प्रारब्ध*, *दिल्या!* घरी तू सुखी रहा! ही कथा माणसाच्या स्वीकाराची वेदना स्पष्ट करते. *अभागिनी स्त्री* जीवनातील न बोललं गेलेलं दुःख उघड करते. तर स्वभावाला औषध आहेच असं *मंजुळाबाई* ठामपणे सांगते. जीवनाचा संदेश देणारा, कष्ट, स्वाभिमान आणि हार न मानणारी वृत्ती समोर आणणारा *बाळू मिस्त्री*… *जिद्द* निर्माण करणाऱ्या शिक्षकांना यश समर्पण करणारा *विनीत*… माणसाच्या चेहऱ्याच्या मुखवट्यातून समाजातील ढोंग उघडे करणारा *बहुरूपी*… मुलांना संगीत क्षेत्रात पुढे नेण्यासाठी रिक्षा चालवतानाही उत्सव साजरा करणारा *मल्हार*… काटकसर आणि शिस्तीतून जीवन जगणारा *मारोतराव.*.. दलित कुटुंबात जन्म घेऊन स्वाभिमानाने जगणारा *महादू*… हे ही दिवस जातील असं विश्वास दाखवणारा *बबन*… दंगा करणारा *नाग्या शिंपी*… अचूक समाज मन ओळखून माणसातला दुरावा कमी करणं हा व्यवसाय करणारा *माणिक बाबा*… जीवनातील आध्यात्मिक समाधानाचे दर्शन घडवणारा पिकातून डोलणारा विठू… पाटातून वाहणारी चंद्रभागा… या साऱ्या वल्ली व्यक्ती चित्रांचा संग्रह नसून जीवनाकडे पाहण्याची दृष्टी शिकवतात. जीवन जगण्याची पद्धत, नातेसंबंध, परंपरा, निसर्गाशी असलेलं नातं साध्या सोप्या सरळ भाषेत मांडलं आहे. या साऱ्या वल्ली कधी हसवतात, रडवतात, चिडवतात, भांडतात आणि वाचकांच्या मनाला स्पर्श करत करत पुढे जातात. साध्या माणसांच्या संघर्षातून मोठे जीवनतत्व सांगणारा हा कथासंग्रह वाचकांच्या मनाला थेट भिडतो आणि आशावाद शिकवतो.

माणसा माणसातलं नातं, हृदयातली आपुलकी, नात्याचा ओलावा, जिव्हाळ्याची उब, माणुसकीचा सुगंध, स्नेहाची सावली, विश्वासाचं नातं, हे सारं असामान्यत्व या सामान्य माणसात दडलं आहे.

विद्यार्थी वर्गाला ही सहज समजेल अशी साधी सोपी सरळ भाषा गावाची ओढ निर्माण करते.

वर्धा जिल्ह्यातलं पुलगाव तालुक्यातलं नाचणगाव ही लेखकाची जन्मभूमी

हे त्यांनी सगळं जवळून पाहिलं, वाचलं, त्यांनी ते अनुभवलं हे त्यांच्या लिखाणातून अगदी स्वच्छ दिसतं. आजच्या शहरी धावपळीच्या जीवनात हे पुस्तक आपल्या मातीशी, संस्कृतीशी जोडून ठेवण्यात लेखकांच्या या लघुकथा संग्रहानी यश मिळवलं.पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा