*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा गझल कट्ट्याच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित गझल संग्रह रसग्रहण*
*’साहित्य-प्रकाश गझल कट्टयाचा’*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
*गझलोद्यान*
^^^^^^^^^^^
पुणे येथील छत्रपती संभाजीमहाराज उद्यानातील ‘साहित्य-प्रकाश गझलकट्टया’ च्या शंभराव्या कार्यक्रमानिमित्त ‘गझलोद्यान’ या शंभर गझलांच्या प्रातिनिधिक संग्रहाचे संपादन वसंत गोखले, डॉ. अविनाश सांगोलेकर,सुधीर कुबेर,मकरंद घाणेकर, योगेश काळे यांनी केले आहे.त्याचे प्रकाशन ९ नोव्हेंबर २०२५, रविवार रोजी दुपारी पुण्यात भावे स्कूलच्या परिसरातील ‘भारतीय विचार साधना सभागृहा’त गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
‘माझी गझल’ या संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला हा गझलोपयोगी उपक्रम पहिल्यांदा पुण्यात ‘स्नेहसदन’ येथे,नंतर पिंपरी चिंचवडला आणि त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग असा प्रवास करत
‘साहित्य-प्रकाश गझलकट्टा’ या स्वरूपात पुणे येथील छत्रपती संभाजीमहाराज उद्यानातील म.न.पा.पुरस्कृत गेली आठ वर्षे पुणे इथल्या छ्त्रपती संभाजी महाराज उद्यानात म. न. पा. पुरस्कृत ‘साहित्यिक कट्टा’ येथे स्थिरावला.त्याला आता आठ वर्षे झालेली असून आजपर्यंत एकूण १०० गझलकट्टे आयोजित करण्यात आले आहेत.त्यामुळे संग्रहातही शंभर गझला समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
या संग्रहातील बहुतांश गझलकार हे २०१७ ते २०२५ या आठ वर्षांच्या कालावधीत नियमितपणे ‘साहित्य -प्रकाश गझलकट्टा’ या उपक्रमात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सहभागी होत आलेले असून त्यात त्यांनी आपल्या गझल, गझलेतर कविता यांचे सादरीकरण केले आहे. त्यावर डॉ. अविनाश सांगोलेकरांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित गझलकारांनी साधकबाधक चर्चा केलेली आहे.अशा २४ जणांच्या प्रत्येकी चार गझला आणि ‘गझलकट्टया’वरील दिवंगत चार गझलकार यांच्या मिळून शंभर गझला असे या संग्रहाचे स्वरूप आहे.आजपर्यंतच्या मराठी गझलविश्वातील हा सोळावा प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रह आहे.
*’गझलोद्यान’मधील गझलांबाबत :*
डॉ. अविनाश सांगोलेकरांच्या गझलेचा मतलाच सांगतो, गझललेखन साधी, सोपी गोष्ट नाही. जेव्हा काळीज फाटेल,तेव्हाच गझल जन्माला येईल.जेव्हा तुम्ही तिचा तळ खोलवर गाठाल, तेव्हाच ती उंच भरारी घेईल.पहा:
*”जन्मास गझल येते, काळीज फाटल्यावर!*
*ती उंच उंच जाते, तळ खोल गाठल्यावर!”*
अविनाशसरांचे जीवन आणि त्यांची गझल या दोहोंचे अतूट नाते सांगणारी त्यांची मक्त्याची द्विपदी (शेर) पहा:
*”जर जीवनातुनी ह्या, केली वजा गझल ही,*
*’अविनाश’ प्राण त्याचा, सोडील खाटल्यावर!”*
याच आशयाचा अनिल कुलकर्णींची द्विपदी बघा:
*”श्वास मोकळा घेण्यासाठी मार्ग भेटला,*
*जीवन माझे गझल नव्याने नटवत आहे!”*
डॉ. प्रशांत पाटोळे यांची द्विपदी गझलेला कोणती उपमा देते बघा :
*”रत्न शब्दांचे मराठी वेचते माझी गझल!*
*अमृताचा गोड पान्हा पाजते माझी गझल!”*
याच गझलेची शेवटची द्विपदी गझलेचे सामर्थ्य दर्शवणारी:
*”प्रेम देऊ, प्रेम घेऊ, वैर सारे संपवू,*
*स्वर्ग बनवू ह्या धरेचा सांगते माझी गझल!”*
राजन लाखे मक्त्याच्या द्विपदीतून नवोदितांना एक छान सल्ला देतात. गझल लिहिण्याची घाई नको. जेव्हा हृदयात वेदनेचा चित्कार येईल, तेव्हाच गझल आपसूकच प्रकट होईल:
*”ह्या गझललेखनाची,घाई कशास ‘राजन’?*
*हृदयात वेदनेचा चित्कार पाहिजे रे!”*
राजश्री सोले तर म्हणतात:
*”कोंडले मी दु:ख माझे शायरीतच,*
*शेर,मतले सर्व माझे यार झाले!”*
सुरेश भटसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे गझलकार हा उत्तम कवी असायलाच हवा. पण तो जेव्हा गझलेवर प्रेम करू लागतो, तेव्हा त्याची कविताही नकळत गझल होऊन जाते,असे सांगणारी वसंत गोखले यांची द्विपदी बघा:
*”कवितेस मी कधीही बसलो लिहावया जर,*
*गझलेत का तरीही बदलून जायची ती?”*
श्रीकांत वाघ सांगतात,एखाद्याला प्रेयसीच्या लाजण्यामधूनही गझल सुचते.बघा:
*”स्पर्श होता तो हवासा, पण नवा पहिला जरा,*
*’इश्य’ म्हणुनी, ती गुलाबी लाजता सुचली गझल!”*
अशा प्रकारे २८ गझलकारांनी आपल्या शंभर गझला वेगवेगळ्या अक्षरगणवृत्तांमध्ये,तसेच मात्रावृत्तांमध्ये लिहिलेल्या आहेत.
कै. निशिकांत देशपांडे यांची द्विपदी मुलगा आणि मुलगी यांच्या भेदभावावर भाष्य करणारी पुढीलप्रमाणे आहे:
*”नवस बोलुनी, देवकृपेने घरात मुलगा जसा जन्मला,*
*नकोनकोशी, अधीच होती,आता तर तिला कुणी पुसेना!”*
कै. विश्वास गांगुर्डे जीवनानुभवावर व्यक्त होताना म्हणतात,
*”कोणी नसते आपुलकीचे जगात जेव्हा,*
*खांद्यावरुनी वाहुन न्या आपले कलेवर!”*
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान व्यक्त करणारी डॉ. आनंद महाजन यांची द्विपदी:
*”घरेदारे,गुरेढोरे,बियाणे,पीकही गेले,*
*असे सर्वस्वही गेले,ढगा तू रोज पडल्यावर!”*
भ्रष्टाचारी कृतीवर प्रकाशझोत टाकणारी दिवाकर चौकेकरांची द्विपदी बघा:
*”औषधात तर सोडा यारो,*
*तेथेही खातात दलाली!”*
स्त्री शिक्षित होऊनही तिच्या स्थितीत आजही फारशी सुधारणा होऊ शकलेली नाही,हे सांगणारी बबन धुमाळ यांची द्विपदी बघा:
*”एवढी शिकल्यावरीही हातचे प्यादेच झाली,*
*साफ खोटे शिक्षणाने धूर्त झाली यार नारी!”*
एके काळी बळिराजा सुखी होता,हे सुधीर कुबेर पुढीलप्रमाणे सांगतात,
*”दिवस होते ते सुगीचे,काय त्यांची कौतुके?*
*ना कधी सुकला शिवारी वाहणारा कालवा!”*
अशा एकापेक्षा एक सरस गझलांनी आणि द्विपदींनी साकारलेला हा संग्रह आहे.
या संगहास डॉ. अविनाश सांगोलेकरांची प्रस्तावना असून त्यात त्यांनी ‘गझलकट्टया’चा सविस्तर वृत्तांत सुंदर शब्दांमध्ये दिला आहे. तसेच ‘साहित्य -प्रकाश’ चे संस्थापक आयोजक वसंत गोखले यांनी आपल्या मनोगतात संस्थेबद्दल आणि ‘गझलकट्टया’बद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.
संग्रहात २८ गझलकारांच्या गझलांबरोबर प्रत्येकाचे छायाचित्र व अल्प परिचय अंतर्भूत करण्यात आलेला आहे.अशा या प्रातिनिधिक मराठी गझलसंग्रहाचे प्रकाशक अनिल पवळ,गोंदण पब्लिकेशन,निगडी, पुणे येथून केला आहे.
गझलसंग्रह : ‘गझलोद्यान’
मुखपृष्ठ : वक्रतुंड ग्राफिक्स
मांडणी : अर्चना कुलकर्णी
मुद्रक : गोंदण क्रिएशन्स, पुणे
स्वागतमूल्य : ₹१५० फक्त.
Phone:- 9850613602
*समीक्षण:*
शोभा वागळे,
पुणे
8850466717
