*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पदर* ….
झाकला पदर वक्षावरती,
लाज झाकली कौशल्याने!
रक्षण करी तारुण्याचे,
ती पदराच्या आधाराने!..१
पदर बालकाच्या हाती,
आईस ओळखी स्पर्शाने!
करी प्रेमळ पदराशी चाळा,
बाळ गोजिरे वात्सल्याने!..२
पदराचे नाते वेगवेगळे,
पदर झाकतो मुखकमला!
जणू कृष्ण मेघ झाकाळे,
नभातील त्या चंद्रकलेला!.३
तरूण असो वा वृध्द असो,
देखणी असो वा कुब्जा!
पदराचे अवगुंठन शोभे,
स्त्रीत्वाच्या मोहक साजा!..४
उज्वला सहस्रबुध्दे, पुणे
