*ओंजळीतील शब्दफुले समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री पुष्पा कोल्हे लिखित अप्रतिम लेख*
*फिल्टर कॉफी: नाट्यावलोकन*
चेंबूर तुर्भे शिक्षण संस्था संचलित ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालयाचे प्रांगण, बऱ्यापैकी मोठ्या क्रीडामंचाचे नाट्यरंगमंचात रूपांतरण, उत्कृष्ट नेपथ्य, उत्तम आवाजाची व्यवस्था आणि खुर्च्यांची मांडणी असलेला बंदिस्त शामियाना अशा सज्जतेत आज सोमवार दि. २२/१२/२०२५ रोजी, महेश मांजरेकर लिखित व दिग्दर्शित *फिल्टर कॉफी* हे नाटक बघण्याचा योग आला.
महेश मांजरेकर म्हणजे एक कसलेले अभिनेते, कुशल कलाकार,व ताकतवर लेखक तसेच एक श्रेष्ठ दिग्दर्शक. त्यांचं एक नवीन मराठी रहस्यमय थरारनाट्य (Suspense Thriller) म्हणजे फिल्टर कॉफी. विराजस कुलकर्णी, उर्मिला कानेटकर, अंकिता लांडे नंतर आता जुईली देउळकर, विक्रम गायकवाड, आणि कुणाल मेश्राम यांच्यासारखे हरहुन्नरी व कलेशी इमान, निष्ठा व प्रेम असलेले कलाकार यात आहेत.
नाटक मराठी पण नाव मात्र परभाषी…त्यामुळे नाटक पाहण्याची उत्सुकता बळावली होतीच. नावावरून वाटलं की काही पाश्चिमात्य शैलीचं कथानक असावं की काय.. पण मराठी भाषक कलाकारांचं हे मराठीच नाटक आहे. हं.. त्यातील पात्रांच्या तोंडी काही वेळा इंग्रजी संवाद येतो पण तो त्या भूमिकेला आवश्यक व साजेसाच. त्यामुळे हे नाटक आजच्या पिढीचं वाटतं.
नाटकाची नायिका साधारण ३०-३५ वयोगटातील कलाकार अनिता हिच्या आयुष्याभोवती फिरते. तिच्या पतीच्या अचानक अपघाती मृत्यूनंतर केवळ त्याच्या आठवणीत रमणारी, पोर्ट्रेट्स, रंगचित्रांचा स्टुडिओ चालवत कालक्रमणा करणारी. एका अनपेक्षित वळणावर विक्रम नावाच्या तरुण कलाकार स्वार्थबुद्धीने तिच्या आयुष्यात येतो. आणि तिच्या आयुष्यात एकदम नाट्यमय घडामोडी घडतात.
सद्यस्थितीतील जिव्हाळ्याचा व आवश्यक विषय म्हणजे मुलींची सुरक्षा. वासनांध पुरुष मुलीला किंवा विवाहित स्रीलासुद्धा प्रेमाचे नाटक करून जाळ्यात ओढतो. सरळमार्गी मुली ते खरे प्रेम समजून फशी पडतात, सर्वस्व गमावून बसतात, नको ते घडून जातं आणि विवाहापूर्वीच गर्भारपण येतं तेव्हा जबाबदारी स्वीकारण्यास मात्र तो तयार नसतो….! नाटकांतून अशा मुलींना बोधपर शिकवण मिळते. हे नाटक स्री-शक्तीचे उन्नयन करते. तिला अबला समजणाऱ्या पुरुषी वृत्तीच्या वाईट वागण्याला दुर्गेचा अवतार धारण करत कठोर बनून, कृतीतून उत्तर देते. हे कथानक समाजमनाला विचार करण्यास भाग पाडते. तसेच रसिक प्रेक्षकांना कॉफीसारखीच हळूहळू उलगडणारी, चवदार आणि रहस्यमय कथा अनुभवण्यास देते.
कलाकार विराजस कुलकर्णी (विक्रम भांडारकर) एक उमदा, हुशार, तरुण. मानसीच्या मदतीने अनिताच्या घरात प्रवेश करतो ..खोटंनाटं बोलून, दिवंगत पतीच्या स्मृतीत रमणाऱ्या, सरळ मनाच्या कलावंत विधवेला म्हणजे अनिताला फसवत राहतो पण ते तिला कळत नाही कारण तिच्या मनात त्याच्याविषयी तशा भावना नसतात. तिच्या नावाचा, कलाकारीचा उपयोग अधिक पैसा मिळवण्यासाठी करण्याच्या उद्देशानेच तो तिथे आलेला असतो. एक दिवस उर्मिला कानेटकर,(अनिता सरदेसाई) कडे तो वैषयिक भावनेने, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी लग्न कर… किंवा लग्न नको करूस पण मला जवळ कर….’असे सांगतो . तेव्हा अनिता अत्यंत कणखरपणे, निग्रहाने नकार देते. त्याचा डाव हाणून पाडते व ते ठिकाण सोडून तडक घर गाठते. हा प्रसंग अगदी शिकण्यासारखा आहे. कुणी आपल्याला फसवू पाहात असेल तर अशा वेळी निग्रहपूर्वक, ठामपणे नकार देत स्व-शीलास जपावयास शिकलं पाहिजे.
जुईली देउळकर (मानसीची भूमिका) , पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या कमावत्या तरुण मुलीने, खोट्या प्रेमाचा आव आणून आपल्याला फसणाऱ्या मुलावर पटकन आंधळा विश्वास ठेवून स्वत्व गमावून बसू नये, अन्यथा येणारी परिस्थिती अतिशय भयानक असते हे परिणामकारकरीत्या दाखवले आहे.
विक्रम गायकवाड( सॅंडी) मर्यादा न ओलांडता सहकार्यशील घनिष्ठ मित्रांची भूमिका उत्तमच.)
कुणाल मेश्राम( विष्णू) म्हणजे घरगडी, खानसामा, माळी, ड्रायव्हर, रक्षक इ. छान रंगवला आहे . विष्णूची वैदर्भी मराठी व स्पेशल इंग्रजी संवाद रसिक, प्रेक्षकाला या गंभीर प्रश्न हाताळणाऱ्या नाटकात रिझवत राहतात.
सर्वांनी आपापल्या भूमिकांना यथायोग्य न्याय दिला आहे.
नाटकाचा शेवट वाईट, सत्त्वभ्रष्ट, पाशवी पुरुषी वृत्तीचा नाश, त्याचाच खोटा मुखवटा फाडून, स्रीशक्तीच्या बुद्धिचातुर्याने होतो हे प्रभावकारी असून,
‘अयि गिरिनंदिनी’ या स्तोत्राने समर्पकच केला आहे.
अद्वैत थिएटर्स आणि अश्वमी थिएटर्स यांची निर्मिती असलेलं, महेश मांजरेकर यांनी बरेच वर्ष आधी(१९९२ मध्ये ) हे नाटक सादर करायचे ठरवले होते, पण आता ते दिग्दर्शित करत आहेत. इतक्या कालावधीनंतरही हे नाटक आजही तितकंच कालसंगत, विचार जागवणारं आहे.
थिएटर नसलेल्या उपऱ्या ठिकाणी नाटक करणं, उभारणं सोपं नाहीच. पण तरीही प्रवेशानुसार आवश्यक नेपथ्य, (आणि वेशभूषाही) एवढ्या कमी प्रकाशात, कमीत कमी आवाजात, अल्पावधीतच म्हणजे काही सेकंदातच, इतक्या झटपट कसे काय बदलतात ह्या गोष्टींनी मन अचंबित होते!
प्रकाशयोजनाही साजेशीच!
बैठक व्यवस्था नाट्यगृहात असते तशी इथे करणं दुरापास्तच ! दर्जेदार नाटक ही एवढी कलाकृती प्रत्यक्ष आपल्या घराजवळ चेंबूर येथे बघायला मिळते ही गोष्टच खूप मोलाची, भाग्याची, समाधानाची व आनंदाचीही म्हणूनच मनापासून कौतुकाचीही!
—पुष्पा कोल्हे
एक नाट्यप्रेमी, साहित्यरसिक
चेंबूर मुंबई ७१
