You are currently viewing *सुटल्या गाठी* (अनलज्वाला वृत्त)

*सुटल्या गाठी* (अनलज्वाला वृत्त)

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सुटल्या गाठी* (अनलज्वाला वृत्त)

 

साक्षीभावे पाही जेव्हा गतकालाला

जाणवते मज अपार तृप्ती शांत मनाला..

 

हळूच मग मी पीळ उसवते बंधनातला

तो एक श्वास मुक्त मोकळा तेव्हा सुटला

 

सुटल्या गाठी सुटली माया निरोप समयी

विरक्त झाले संसारी मी नच लोभमयी

 

त्या काळाच्या गाठोड्याला कशास उपसा

का अडकावे पुनश्च आता नुसता जलसा

 

मावळतीचे रंग मनाला किती भुलवती

बघायचे का वळून मागे वळणावरती

 

आयुष्याच्या चौरंगावर विणले धागे

जो येतो तो जातो सारे ठेवित मागे

 

नकोत गाठी नकोत भेटी अलिप्त व्हावे

जळी राहोनि कोरडेपणी सुख मानावे

 

सुखदुःखाच्या गाठी मधले आर्त गुंतणे

काळासोबत विरुनी जावो हेच मागणे

 

*राधिका भांडारकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा