सिंधुदुर्गात 26 डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयांची होणार तपासणी
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण 59 खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे रुग्णशुल्क व इतर रुग्णालयीन सेवा शुल्क दरपत्रक प्रत्येक खाजगी रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये ठळक लावणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र नर्सिंग होम कायद्यातील सर्व तरतुदींचे खाजगी हॉस्पिटल मधून पालन होते की नाही याची खातर जमा करण्याकरीता 26 डिसेंबर 2025 पासून धडक मोहिमेद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी प्रसिद्धी प्रत्रकाव्दारे कळविले आहे.
रुग्ण हक्क संहिता (रुग्णांना असलेले अधिकार) दर्शनी भागामध्ये ठळक अक्षरांमध्ये दर्शविणे बंधनकारक आहे. सर्व हॉस्पिटलचे इलेक्ट्रिसिटी आणि फायर ऑडिट झालेले असणे बंधनकारक आहे. ज्या खाजगी रुग्णालयांमध्ये नमूद कायद्यातील तरतुदींचे अनुपालन होत नाही, असे निदर्शनास आल्यावर या कायदे अंतर्गत उचित कार्यवाही प्रस्तावित करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सुचित केलेले आहे.
