You are currently viewing उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत श्री छत्रपती मंडळ प्रथम

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत श्री छत्रपती मंडळ प्रथम

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पारितोषिक देवून मंडळाचा गौरव

 

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व पु.ल.देशपांडे कला अकादमी मुंबई यांच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तालुकास्तरावर इचलकरंजी येथील गावभाग परिसरातील श्री छत्रपती व्यायाम मंडळाने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

येथील गावभाग परिसरातील श्री छत्रपती व्यायाम मंडळाने विविध सण ,उत्सवाच्या निमित्ताने कला – संस्कृतीची परंपरा जपतानाच समाज प्रबोधनात्मक कार्यावर विशेष भर दिला आहे.तसेच गणेशोत्सवात आकर्षक गणेशमूर्ती व हलता देखाव्यात विविधता आणत नाविन्यता जपली आहे. या मंडळाने यंदाच्या वर्षी हल्लीच्या धकाधकीच्या काळात सदृढ शरीरासाठी आवश्यक असलेल्या योग, प्राणायाम संस्कृतीचे दर्शन घडवण्याबरोबरच त्याचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टीने यावर आधारित हलता देखावा सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व पु.ल.देशपांडे कला अकादमी मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत या मंडळाने सहभागी होत तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे. याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते मंडळाचे अध्यक्ष राजू पुजारी, मार्गदर्शक बाळासाहेब सोलगे यांना पारितोषिक, रोख २५ हजार रुपये आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विविध शासकीय अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या यशाबद्दल श्री छत्रपती व्यायाम मंडळाचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा