सावंतवाडीसह सिंधुदुर्गातील कणकवली, मालवण, वेंगुर्ला नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पुन्हा एकदा लोकशाही जिंकली का..? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनास सतावू लागला. कारण जनशक्तीपेक्षा धनशक्तीचा वापर कधी नव्हे एवढा या निवडणुकीत झाला होता. त्याचा परिणाम नक्कीच सावंतवाडी शहरातील काही वॉर्ड मध्ये दिसून आला. यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे प्रस्थापितांना धक्का देत जागरूक नागरिकांनी नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी दिली आहे. यामध्ये पराभूत झालेले प्रामुख्याने नाव घेता येईल असे उमेदवार म्हणजे माजी नगराध्यक्षा आनारोजीन लोबो, गोविंद वाडकर, राजू बेग, सुरेंद्र बांदेकर. या वर्षानुवर्षे राजकारणाचे अमृत प्राशन केलेल्या दिग्गज उमेदवारांचा नवख्या उमेदवारांनी पराभव केला आहे. यावेळी प्रभाग ७, ८, १० वगळता मतदारांनी ‘ अ ‘ आणि ‘ ब ‘ गटात वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार निवडून दिले आहेत. याचे एक कारण दोन्हीकडून मिळालेली धनशक्ती, त्यामुळे मत देखील प्रत्येकी एक द्यायचे किंवा मतदारांचा समजूतदारपणा असेही असू शकतो. परिणामी सावंतवाडीत भाजपचे ११ उमेदवार, शिवसेनेचे ७, काँग्रेसचा १ आणि उबाठाचा १ उमेदवार निवडून आला आहे. परंतु या सर्व घडामोडींमध्ये सावंतवाडीच्या जनतेने राजघराण्याचा सन्मान राखून युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याने सावंतवाडीत भाजपला ‘राज’ योग आला आहे. विकसित सावंतवाडीचे त्यांनी दाखवलेले स्वप्न, ड्रेनेज समस्या, उघडे गटार आदींचे उच्चाटन करून शहर विकासाचे व्हिजन आणि मुख्य म्हणजे रखडलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल याला जनतेने प्राधान्य दिल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
सावंतवाडी शहरातील जनता सुज्ञ आहे, ती योग्य त्याच व्यक्तीला निवडून देणार हे वेगळं सांगण्याची गरज नसते. सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी गेली काहीवर्षे शहरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार अशी घोषणा केली. परंतु राजघराण्याकडून जागा हस्तांतरित करण्यास विलंब झाला किंवा वारसांपैकी कुणीतरी त्यात अडथळा आणला. परिणामी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम रखडले आणि रुग्णांचा बांबुळी दौरा सुरूच राहिला. त्यामुळे राजघराण्याला प्रतिनिधित्व दिल्यास सदरची रुग्णालयाची समस्या मार्गी लागेल अशी आशा वाटल्याने एकदा राजघराण्याला पर्यायाने भाजपला संधी देऊन बघावं असाही विचार शहरवासीयांनी केला असेल आणि भाजपाच्या हातात शहराची सत्ता दिली.
शहरवासीयांनी युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना निवडून देताना त्यांच्या घराण्याचा सन्मान राखला आहे. कारण राजघराण्याकडून यापूर्वी अनेकांनी राजकीय कारकिर्द गाजवली आहे. परंतु मध्यंतरीच्या काळात सावंतवाडीच्या राजकारणापासून राजघराणे दूर होते. युवराज लखमराजेंनी राजकारणात प्रवेश केल्यावर पुन्हा राजघराणे राजकीय प्रवाहात सक्रिय झाल्याचे दिसत होते आणि श्रद्धाराजेंच्या रूपाने आज राजघराणे खऱ्या अर्थाने राजकीय वाटचाल करत असून नक्कीच भविष्यात युवराज लखम राजे भोसले देखील भाजपकडून विधानसभेच्या निवडणुकीत उतरतील अशी शक्यता वाटू लागली आहे. सावंतवाडी शहरातील नगरपालिका निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रवाह असताना देखील युवराज्ञी श्रद्धाराजेंनी दाखवलेली समयसूचकता, भुयारी गटार, ड्रेनेज सिस्टीम आदींसह विकसित सावंतवाडीचे व्हिजन लोकांना भावले. मराठीवर जरी त्यांचं प्रभुत्व नसले तरी अल्पावधीत त्यांनी शिकलेली, बोललेली मराठी यामुळे युवराज्ञी लोकांना आपलीशी वाटू लागली. त्याचाच परिणाम म्हणून लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि भरघोस मते देऊन निवडून आणलं. भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरविण्याची खेळलेली खेळी यशस्वी झाली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर “आपण सावंतवाडीतील जनतेचे प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवणार” अशी सकारात्मक प्रतिक्रिया युवराज्ञी श्रद्धाराजेंनी दिली आहे.
