सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक मतमोजणी फेरीनिहाय आराखडा जाहीर
रविवार २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार निकाल
सावंतवाडी:
सावंतवाडी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची मतमोजणी येत्या २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून तहसील कार्यालय येथे होणार आहे. याबाबतचा फेरीनिहाय मतमोजणी आराखडा निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सावंतवाडी यांनी प्रसिद्ध केला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सावंतवाडी नगरपरिषदेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी २१ डिसेंबर रोजी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार, ही मतमोजणी एकूण ५ फेऱ्यांमध्ये घेतली जाणार आहे.
पहिल्या फेरीमध्ये केंद्र क्रमांक १/१, २/१, ३/१, ४/१ आणि ५/१ ची मतमोजणी होईल. दुसऱ्या फेरीमध्ये केंद्र क्रमांक १/२, २/२, ३/२, ४/२ आणि ५/२ चा समावेश असेल. तिसऱ्या फेरीमध्ये केवळ केंद्र क्रमांक २/३ ची मतमोजणी करण्यात येईल. चौथ्या फेरीमध्ये केंद्र क्रमांक ६/१, ७/१, ८/१, ९/१ आणि १०/१ ची मोजणी होणार असून, पाचव्या व अंतिम फेरीमध्ये केंद्र क्रमांक ६/२, ७/२, ८/२, ९/२ आणि १०/२ मधील मतांची मोजणी केली जाणार आहे.
या मतमोजणी प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली असून, उमेदवार आणि नागरिकांच्या माहितीसाठी हा फेरीनिहाय तपशील जाहीर करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

