You are currently viewing डाॅक्युमेंटरी स्पर्धेत घारपी शाळेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

डाॅक्युमेंटरी स्पर्धेत घारपी शाळेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड

*डाॅक्युमेंटरी स्पर्धेत घारपी शाळेची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड*

*बांदा,*

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या डाॅक्युमेंटरी या स्पर्धा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी या शाळेची कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२५-२६या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत घारपी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील यांनी डाॅक्युमेंटरी या स्पर्धा प्रकारात सहभाग नोंदवला होता.
या डाॅक्युमेंटरीमध्ये दिवाळी सणाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध साहित्याची विक्री करून जमा केलेल्या निधीतून मराठवाड्यातील पूरग्रस्त शाळांमधील विद्यार्थ्यांना मदत या प्रेरणादायी शैक्षणिक उपक्रमाचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले आहे.
या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या उपक्रमाची दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कोल्हापूर विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, या स्पर्धेत यश मिळाल्यास अंतिम राज्यस्तरीय स्पर्धा गोंदिया येथे संपन्न होणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शाळेतील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, मुरलीधर उमरे, धर्मराज खंडागळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
घारपी शाळेच्या या निवडीमुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी व परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा