शासन निर्णयामुळे शाळा बंद होण्याची भीती; ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ अंतर्गत कृती समितीची स्थापना
वेंगुर्ला :
श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक ही शाळा टिकवण्यासाठी पंचक्रोशीतील पालकांची तातडीची सभा आज हायस्कूलच्या परिसरात पार पडली. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे विद्यालयातील शिक्षक संख्या कमी होऊन भविष्यात शाळा बंद होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याची बाब पालकांच्या लक्षात आल्याने गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व हितचिंतक बंधुभगिनी मोठ्या संख्येने सभेत सहभागी झाले.
‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या उपक्रमांतर्गत उपस्थित पालक व ग्रामस्थांची एक कृती समिती यावेळी स्थापन करण्यात आली. शाळेला भविष्यात होऊ पाहणारा धोका लक्षात घेऊन संयुक्त सह्यांची मोहीम राबवून आपले म्हणणे माननीय जिल्हाधिकारी, पालकमंत्री तसेच जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे मांडण्यासाठी चर्चेतून निवेदन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी स्थापन करण्यात आलेल्या कृती समितीच्या अध्यक्षपदी बाबन बागकर यांची तर सचिवपदी यशवंत फटनाईक यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या चर्चेतून समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आली. सागरतीर्थ ग्रामपंचायतीचे सरपंच एकनाथ कुडव यांनी सभेचे नेतृत्व करत, शाळा आणि मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी सर्वांनी एकदिलाने पुढे येऊन मार्ग काढण्याचे आवाहन केले.
आरवली ग्रामपंचायतीचे सरपंच समीर कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, शाळा वाचवण्याच्या या लढ्यात प्रत्येकाने झोकून देऊन सहभागी व्हावे, तसेच आपल्या आजूबाजूची सर्व मुले या शाळेत कशी दाखल होतील यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती केली. शासनाचा निर्णय बदलण्यासाठी गावातील सर्व लोकांची सर्वतोपरी मदत घेऊन सनदशीर मार्गाने शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
शाळेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र मोंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संबंधित शाळा सध्या एक शिक्षकी होण्याची शक्यता असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. यशवंत फटनाईक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगत, शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, अशी चिंता व्यक्त केली.
यावेळी पोलिस पाटील बाबुराव चोपडेकर, पालक संघ उपाध्यक्ष नरेंद्र मोंडकर, सागरतीर्थ ग्रामपंचायतीचे सदस्य समृद्धी कुडव, मेरी फर्नाडिस, स्मिता फर्नाडिस, गायत्री गोडकर, रचना गोडकर, सेजल नाईक, आत्माराम बागलकर, महेश गोडकर, मयूर आरोलकर, धनश्याम गोडकर, राजाराम बागकर, रविंद्र बागकर, त्रिवेणु चिपकर, विजय आरोलकर, सतीश फटनाईक, शंकर नाईक, बापू भानजी, कृष्णा धुरी, सिद्धी नरसुले, कार्तिकी कांबळी, माधुरी वराडकर, वेदिका गुरव, संतोष नाईक, नारायण वरगावकर, संजय भुबे आदी पालक ग्रामस्थ बंधुभगिनी उपस्थित होते.
