सिंधुदुर्गनगरी:
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आदिशक्ती अभियानात उत्साहाने सहभागी व्हावे. ग्रामपंचायतींनी केलेल्या स्वगुणांकनाची तालुकास्तरीय आदिशक्ती समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून, तालुक्यात उत्कृष्टपणे आदिशक्ती अभियान राबविणाऱ्या तीन ग्रामपंचायतींचे प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच संबंधित ग्रामपंचायतींना भेटी देऊन त्यांनी केलेल्या कामाचे भौतिक निरीक्षण करण्यावर विशेष भर देण्याचेही त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या आदिशक्ती अभियानाचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक १५ डिसेंबर रोजी पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर समित्यांनी आदिशक्ती पुरस्कारासाठी केलेल्या स्वगुणांकनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
महिला स्नेही वातावरण निर्मिती प्रशिक्षण, सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन आदी निकषांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय आदिशक्ती पुरस्कार मिळवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्हा महिला सुरक्षा, महिला हक्क आणि महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असल्याचे नमूद करत, बालविवाह, हुंडा प्रथा व कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या अनिष्ट प्रथांचे प्रमाण जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत कमी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आदिशक्ती अभियानांतर्गत जिल्ह्यातील गावांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार मिळविण्याची क्षमता असून, सर्व गावांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी केले.
या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी,जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व.बा.वि.) मनोज पाटणकर आदी उपस्थित होते.
